नाशिक : गांधीनगर मुद्रणालय वसाहत नामशेष होण्याच्या मार्गावर

gandhinagar www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक-पुणे महामार्गावरील गांधीनगर मुद्राणालय वसाहतीतील इमारतींची पुरती वाताहत झाली आहे. रिकाम्या इमारतींवर जंगलीवेल, वनस्पती वाढल्या आहेत. त्यामुळे कधी काळी गजबजलेले क्वॉर्टर आता खंडर बनले आहेत. वसाहतीतील रहिवाशांची संख्या घटल्याने भुरट्या चोरट्यांसह गर्दुल्ल्यांकडून सरकारी संपत्तीची लूट सुरू आहे. प्रशासकीय दुर्लक्षामुळे गांधीनगर मुद्रणालय वसाहत नामशेष होण्याच्या मार्गावर आली आहे.

गांधीनगर मुद्रणालयाच्या स्थापनेनंतर प्रेस कामगारांसाठी सुमारे 50 इमारती बांधल्या होत्या. या इमारतींमध्ये साडेतीन हजारांपेक्षा जास्त कामगार कुटुंबे वास्तव्यास होते. सन 2000 नंतर गजबजलेल्या वसाहतीला उतरती कळा लागली. प्रेसमधील कामगारांच्या संख्येत घट झाल्याने तसेच काही कामगारांनी लगतच्या परिसरात स्वमालकीचे घर घेतल्याने इमारती रिकाम्या होऊ लागल्या. आजमितीला अवघ्या दहा इमारती सुस्थितीत असून, तिथे दीडशे ते दोनशे कुटुंबे वास्तव्यास आहेत. त्यातही प्रेस कामगारांची संख्या नगण्य आहे. पोटभाडेकरूंचा भरणा जास्त आहे. गांधीनगर मुद्रणालय वसाहतीत मोजक्याच कामगारांच्या कुटुंबांचे वास्तव्य आहे. त्याचाच फायदा चोरट्यांसह गर्दुल्ल्याने घेत इमारतीच्या दरवाजे, तसेच घरांचे कडीकोयंडे, नळ, प्लास्टिक, लोखंडी पाइप, खिडक्यांची तावदाने, विद्युत साहित्यांची लूट केली आहे. तसेच लोखंडी रॉडसाठी काही इमारतीच्या स्लॅबचीही गर्दुल्ल्यांकडून तोडफोड करण्यात आली आहे. इमारतीच्या इमारती ओस पडल्याने रिकामे क्वॉर्टर अवैध धंद्याचे अड्डे बनले आहेत. दरम्यान, मुद्रणालयाच्या अधिकार्‍यांसह डॉक्टरांसाठी पाच बंगले बांधले होते. हे सर्व बंगले बंद असून, तेही मोडकळीस आले आहेत. तर मनपाच्या दोन शाळाही पटसंख्येअभावी बंद पडल्या आहेत.

रिकामे क्वॉर्टर टवाळखोरांचे अड्डे
गांधीनगर प्रेस वसाहतीच्या संरक्षण भिंतीलगत असलेल्या इमारतींची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. दिवसभर तसेच रात्रीच्या सुमारास मोडकळीस आलेल्या इमारतींचा ताबा टवाळखोर घेतात. अनेक ठिकाणी गर्दुल्ले बस्तान मांडतात. त्यामुळे या इमारतींकडे सर्वसामान्य फारसे फिरकत नाही. या क्वॉर्टरमध्ये अनेकदा वेगवेगळ्या गुन्ह्यांतील संशयितांचा वावर दिसून येतो.

ठिकठिकाणी पसरले कचर्‍याचे साम्राज्य
वसाहत रिकामी झाल्याने इमारतींना तडे गेले आहे. संरक्षण भिंतीला भगदाड पडले आहे. बहुतांश सर्वच इमारतीमध्ये कचर्‍यांचे साम्राज्य पसरले आहे. फुटबॉल मैदानासमोर नागरिकांकडून तर पोस्ट कार्यालयासमोरील जागेत मांसविक्रेत्यांकडून सर्रास कचरा टाकला जातो आहे. त्यामुळे भाजीमार्केटसह मुख्य रस्त्याने जाणार्‍या-येणार्‍या नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागतो.

हेही वाचा:

The post नाशिक : गांधीनगर मुद्रणालय वसाहत नामशेष होण्याच्या मार्गावर appeared first on पुढारी.