Site icon

नाशिक : गांधील माशांच्या हल्ल्यात महावितरण कर्मचारी अस्वस्थ

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा

पावसाळापूर्व कामकाज करताना गांधील माशांनी अचानकपणे हल्ला केल्याने महावितरण कंपनीचा कर्मचारी जखमी झाल्याची घटना मखमलाबाद रोडवर शनिवारी (दि.६) दुपारी १२.३० च्या सुमारास घडली. शेकडो गांधील माशा घोंगावत मागे लागल्याने जिवाच्या आकांताने पळ काढून जवळील एका दुकानात आश्रय घेतल्याने संबंधित कर्मचारी बालंबाल बचावला.

महावितरण कंपनीच्या वतीने शहरात पावसाळापूर्व कामे सुरू असून, विद्युत तारांलगत असलेल्या वृक्षांच्या फांद्या छाटण्याची मोहीम सुरू आहे. या मोहिमेंतर्गतच पंचवटी विभागातील मखमलाबाद नाका कक्षातील लाइनमन योगेश बर्वे हे शनिवारी दुपारच्या सुमारास नेहमीप्रमाणे मखमलाबाद रोडवरील अवध प्रकल्पाजवळ कामकाज करीत होते. विद्युत तारांना लागणाऱ्या फांद्या तोडण्याचे काम सुरू असताना झाडावरून शेकडो गांधील माशांनी योगेश बर्वे यांच्यावर हल्ला केला. अचानक झालेल्या या प्रकाराने ते प्रचंड घाबरून गेले. चवताळलेल्या माशांपासून बचाव करण्यासाठी त्यांनी जीव मुठीत धरून पळ काढला. रस्त्यालगतच्या एका दुकानात शिरून दुकानाचे शटर लावून घेतल्याने पुढील अनर्थ टळला. हा सर्व प्रकार पाहून तेथील रहिवासी सचिन जाधव व तुपे ड्रायव्हिंग स्कूलचे रुपेश तुपे यांनी मदतीसाठी धाव घेतली. त्यावेळी त्यांना दुकानामध्ये बर्वे हे बेशुद्ध होऊन पडलेले दिसले. त्यांनी तत्काळ डॉ. विशाल घोलप यांच्याकडे उपचारासाठी दाखल केले. आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

हेही वाचा:

The post नाशिक : गांधील माशांच्या हल्ल्यात महावितरण कर्मचारी अस्वस्थ appeared first on पुढारी.

Exit mobile version