
नाशिक (मनमाड) : पुढारी वृत्तसेवा
आम्ही फायनान्स कंपनीचे वसुली अधिकारी असून तुमच्या गाडीचे हफ्ते थकले असे सांगून एका तरुणाला मारहाण करत लुटल्याची धक्कादायक घटना शहरातील येवला रोडवर घडली.
खाजगी फायनान्स कंपन्या आणि काही बँकाकडून वसुलीच्या नावाखाली करण्यात येत असलेली दंडेलशाही समोर आली आहे. याप्रकारणी पोलिसांनी एका महिलेसह दोन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत तक्रारदार तरुणाने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, अल्टो कारमधून जात असताना शहरातील येवला रोडवरील शासकीय विश्रामगृहाचे बाजुला महादेव मंदिराच्या समोर वाहन अडवून मालेगावच्या खाजगी फायनान्स कंपनीचे कर्मचारी यांनी विचारपूस केली. तसेच वाहनाचे हफ्ते थकले असून वाहन जप्त करावयाचे आहे असे सांगून वाहन ताब्यात देण्यास सांगितले. ओळख पटेल असे ओळखपत्र किंवा फायनान्स कंपनीचे पत्र, पोलीस ठाण्याची परवानगीपत्र दाखवण्यास सांगितले असता त्या कर्मचा-यांनी काहीही न ऐकता बळजबरीने गाडीतून उतरण्यास सुरवात केली. नकार दिल्यानंतर शिवीगाळ करत मारहाण केली तसेच जवळील रोख पाच हजार रुपयाची मागणी केली. ते पैसे देण्यास नकार दिल्यानंतर संबंधित कर्मचा-यांनी खिशातील एक हजार रुपये बळजबरीने काढून घेतले. त्यानंतर वडिलांनी मालेगावच्या फायनान्स कंपनीकडे वसुली अधिकाऱ्यांबाबत विचारणा केली असता कोणालाही वसुलीसाठी पाठवले नसल्याचे सांगण्यात आले. तसेच वसुली करणारे आमचे कर्मचारी नाहीत असा खुलासा फायनान्स कंपनीने केला. त्यामुळे दोन्ही आरोपी फायनान्स कंपनीच्या नावाचा दुरुपयोग करून कर्ज घेणाऱ्यांना लुटत असल्याचे समोर आले आहे. फिर्यादीवरून पोलिसांनी सोफी शेख आणि गोरख कोरे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मात्र आरोपीना अद्यापही अटक करण्यात आलेली नाही
हेही वाचा:
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय वर्धा रोडवर हलविण्याचे सरकारचे षडयंत्र : नितीन राऊत
- Toshakhana Case : इम्रान खान यांना होणार अटक? निवासस्थानाबाहेर समर्थक पोलिसांशी भिडले
- नागपूर : पब्लिक टॉयलेटसाठी महिलांचा एल्गार; नागपूर सिटिझन्स फोरमचे आंदोलन
The post नाशिक : गाडीचे हफ्ते थकले असे सांगून बनावट फायनान्स कंपनीकडून लूट appeared first on पुढारी.