
नाशिक (मेशी) : पुढारी वृत्तसेवा
नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक शहाजी उमप यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यात सर्वत्र अवैध धंद्यांवर गेल्या काही दिवसांपासून छापेमारी सुरू आहे. त्यात देवळा तालुक्यातही छापा मारणे सुरू असून गावठी हातभट्टया उद्धवस्त करण्याचे काम देवळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाठ आणि पथकाकडून सुरू आहे. त्यामुळे संबंधितांचे धाबे दणाणले आहे.
त्यानुसार शुक्रवार, दि.३ तालुक्यातील कांद्याची मोठी बाजारपेठ आणि जास्त लोकसंख्या असलेल्या उमराणे परिसरात मोठ्या प्रमाणावर गावठी हातभट्टया उद्धवस्त करत गावठी दारू निर्मितीसाठी लागणारे लाखो रुपयांचे रसायन पोलीस पथकाकडून नष्ट करण्यात आले. तालुक्यातील खास करून ग्रामीण भागात दररोज कुठल्या ना कुठल्या तरी गावात कारवाई होत असल्याने सर्वसामान्यांकडून या कारवाईचे स्वागत होत आहे. ग्रामीण भागात नोकरीची वाणवा असून नशिबाला वैतागलेला तरुण वर्ग, शेती व्यवसायाला आलेले वाईट दिवस यामुळे सुशिक्षित तरुण व्यसनाधीन होतांना दिसत आहे. त्यातच गावठी हातभट्टीची दारू गावात सहज आणि स्वस्तात उपलब्ध होत असल्याने दिवसेंदिवस तरुण वर्ग व्यसनाधीन होण्याचे प्रमाण वाढत आहे. परिणामी भांडणे, वादविवाद होऊन भांडण अनेकदा विकोपाला जाऊन त्यात एखादी बरी वाईट घटना घडल्याचे उदाहरणे आहेत. तर अनेकांचे कुटुंब उद्धवस्त होत आहेत. या कारवाईबाबत ग्रामस्थांकडून आनंदाने स्वागत होऊन कारवाई सुरूच ठेवावी अशी प्रतिक्रिया सर्वसामान्यांकडून व्यक्त होत आहेत.
जोपर्यंत देवळा तालुक्याची सेवा करत राहील तोपर्यंत तालुक्यात कुठलेही अवैध धंदे चालू देणार नाही तसे करण्याचा एखाद्याने प्रयत्न केल्यास त्याला पोलीस कारवाईस सामोरे जावेच लागेल. – पुरुषोत्तम शिरसाठ ,सहाय्यक पोलीस निरीक्षक देवळा
हेही वाचा:
- जळगाव : संजय राऊतांच्या जीभेला हाड नाही, तोंडाला लगाम नाही – गिरीश महाजन
- पिंपरी : माता-नवजात बाळाला वाचविण्यात डॉक्टरांना यश
- अडेनॉईड आणि होमिओपॅथिक उपचार
The post नाशिक : गावठी हातभट्ट्या उद्धवस्त; पोलिसांच्या छाप्याने संबंधितांचे धाबे दणाणले appeared first on पुढारी.