नाशिक : गिरणा धरणाची वाटचाल शतकाकडे ; इंतकं भरलं

गिरणा धरण मालेगाव

मालेगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा
जळगाव जिल्ह्यासाठी वरदान ठरणार्‍या महाकाय गिरणा धरणात 92 टक्के जलसाठा झाला आहे. जुलै महिन्यातच झालेला हा जलसंचय आगामी दोन महिन्यांतील पर्जन्यमानाचा अंदाज घेत विसर्ग करून नियंत्रित करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार शनिवारी (दि. 16) धरणाचे गेट नंबर एक व सहा हे एक फुटाने उघडण्यात आले होते. रविवारी अजून दोन गेट उघडण्यात येऊन त्यातून गिरणा नदीत 2,476 क्यूसेक वेगाने पाणी झेपावू लागले आहे.

21 हजार 500 दलघफू एवढी या प्रकल्पाची जलसंचय क्षमता आहे. त्या आधारे ते नाशिक जिल्ह्यातील सर्वात मोठे धरण ठरते. हे धरण निर्मितीपासून (1969) फक्त अकराच वेळा पूर्ण क्षमतेने भरले आहे. त्यात 2004 ते 2007 या काळात सलग चारवेळा भरले होते. तो कित्ता यंदादेखील गिरवला जाणार आहे. 2019 पासून दरवर्षी धरण ओव्हरफ्लो होत आहे. आषाढी एकादशीपासून जिल्ह्यात सुरू झालेल्या मुसळधार पावसाने विक्रमी वेळेत लहान-मोठे प्रकल्प ओसंडून वाहू लागले आहेत. त्यात गिरणा धरण पाणलोट क्षेत्रातील चणकापूर धरणातील जलसाठा 50 टक्क्यांवर मर्यादित करून 3,614 क्यूसेक वेगाने विसर्ग सुरू आहे, तर बागलाण तालुक्यातील हरणबारी, केळझर यासह लघु प्रकल्प भरून मोसम आणि आरम नदीलाही पूरपाणी वाहात आहे. हे सर्व पाणी गिरणा धरणात येत आहे.

जुलैच्या मध्यावरच मोठ्या प्रमाणात पाणी धरणात येऊन पातळी 92 टक्क्यांवर गेल्याने धरण व्यवस्थापन नियमांनुसार शनिवारी दुपारी 12 वाजता धरणाचे दोन दरवाजे, तर रविवारी अजून दोन दरवाजे एक फुटाने उघडले होते. 2,476 क्यूसेक विसर्ग सुरू करण्यात आला. पाण्याची आवक वाढल्यास विसर्ग वाढवण्यात येणार आहे. गिरणा काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. यापूर्वी 2 ऑगस्ट 2005 मध्ये हे धरण भरले होते. तो विक्रम यंदा मोडीत निघण्याची शक्यता आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : गिरणा धरणाची वाटचाल शतकाकडे ; इंतकं भरलं appeared first on पुढारी.