
देवळा : (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा
कळवण तालुक्यातील पश्चिम पट्यात गेल्या तीन -चार दिवसांपासून संतधार पावसाने चणकापूर व पुनंद प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात जोरदार हजेरी लावल्याने गिरणा नदीच्या पाण्याच्या पातळीत आज पहाटे पासूनच प्रचंड वाढ झाली. सोमवारी (दि. 11) रोजी गिरणा नदीच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसाने पाण्याची आवक वाढली असून , चनकापूर धरणातून 18 हजार 539 क्युसेक्स व पुनद धरणातून 2 हजार 442 क्युसेक्स तसेच ठेंगोडा बंधारा वरुन 17 हजार 010 क्युसेक्स इतका विसर्ग गिरणा नदीपात्रात सुरु झाला आहे. पावसाचा जोर टिकून राहिल्यास 2.00 वाजेपर्यंत पाण्याची आवक वाढून विसर्ग 25 हजार क्युसेक्स वाढण्याची शक्यता आहे. नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. अशी माहिती तहसीलदार विजय सूर्यवंशी यांनी दिली.
चणकापूर ३०१९८, पुनद ९५७४ मधून ४० हजाराहून अधिक क्युसेसने पूरपाणी गिरणा व पुनद नदीपात्रात सोडण्यात आल्याने गेल्या सात ते आठ वर्षांनंतर पहिल्यांदा नदीला प्रचंड पाणी आल्याचे नागरिक सांगत आहेत. सकाळी आठ वाजता हा पूल पाण्याखाली गेला. हजारो क्युसेस पाणी विसर्ग व छोटे मोठे नाले भरून वाहत असल्याने गिरणा नदीवरील पाळे,एकलहरे ता. कळवण व सावकी हे पूल आज दिवसभर पाण्याखाली राहणार असल्याची शक्यता आहे.
तालुक्यातील खामखेडा, भउर, सावकी व विठेवाडी गावांच्या नदी लगतच्या शेकडो एकरात नदीचे पाणी घुसले. विसर्ग वाढण्याची शक्यता असल्याने देवळ्याचे तहसिलदार विजय सूर्यवंशी, नायब तहसीलदार विजय बनसोडे यांनी लोहोणेर, सावकी येथे भेट देत पाहणी केली. रहदारी साठी पूल बंद करत नियंत्रण ठेवले आहे. चणकापूर व पुनंद धरणातून मोठ्या प्रमाणात पूरपाणी सोडण्यात आल्याने नदीकाठावरील गावांना पूरपाण्याचा फटका बसनार असून शेती व शेतीपिकांचे नुकसान होणाक आहे. गिरणा, पुनंद या नद्यांना आलेला पूर पाहण्यासाठी गांगवण, बिजोरे, भादवण, पिळकोस, भउर, खामखेडा, सावकी, विठेवाडी गावातील नागरिकांनी सकाळी नदीपात्रालगत पूर पाणी पाहण्यासाठी गर्दी केली होती.
हेही वाचा :
- चार मास्क लावल्याने तरूण गुदमरला; बेशुध्द झाल्याने थेट जिल्हा रूग्णालयात भरती
- कोपरगाव : गोदावरीत 6310 क्यूसेकने विसर्ग सुरु
The post नाशिक : गिरणा नदीला पूर ; 'सावकी-विठेवाडी'चा पूल पाण्याखाली, नागरिकांना सतर्कतेचा इशारा appeared first on पुढारी.