
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक शहरातील गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी पोलिस आयुक्तालयाने नव्याने पाच पथके तयार केली आहेत. खंडणी, दरोडा, शस्त्रे, अमली पदार्थ आणि गुंडाविरोधी पथकांमध्ये निरीक्षकांसह कर्मचाऱ्यांची नियुक्ती झाली आहे. त्यानुसार शहरातील पोलिस ठाणेनिहाय कानाकोपऱ्यातील गुंड, गुन्हेगारांची माहिती संकलित केली जात आहे. या माहितीचे संकलन मध्यवर्ती ठिकाणी होणार असून, आवश्यकतेनुसार तातडीने गुंड, गुन्हेगारांची माहिती घेऊन त्यांच्यावर कारवाई करता येणे पोलिसांना अधिक सोपे होणार आहे.
पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या आदेशानुसार शहरात दृश्य आणि परिणामकारक पोलिसिंगला सुरुवात झाली आहे. रात्री उशिरापर्यंत नाकाबंदी सुरू असून, सायलेन्सर, हॉर्नमध्ये फेरफार करून कर्णकर्कश आवाज करणाऱ्या दुचाकीचालकांवर गुन्हे दाखल करून दुचाकीही जप्त केल्या जात आहेत. त्यामुळे बेशिस्त चालकांमध्ये पोलिसांच्या कारवाईचा धाक निर्माण होत आहे. त्याचप्रमाणे गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी पोलिस आयुक्तालयाच्या वतीने नववर्षात पाच पथके तयार करण्यात आली आहेत. त्यात प्रामुख्याने अमली पदार्थ विक्री रोखणे, खंडणीखोरांना अटकाव करणे, दरोड्यासह शस्त्रांचा अवैध वापर करणाऱ्यांवर कारवाई करून गुंडागर्दीला लगाम लावण्यासाठी पोलिसांनी प्राधान्य दिले आहे. गुन्हेगारी नियंत्रणासह संशयितांवर प्रभावीपणे व जलद कारवाई करण्यासाठी नववर्षापासून रविवारी (दि. १) पथकांचे कामकाज सुरू होणार आहे. पथकांना पोलिस आयुक्तालयात कार्यालयासाठी जागा देण्यात आली आहे. मध्यवर्ती स्वरूपात सर्व गुन्हेगारांची माहिती संकलित करून त्यांच्यावर आवश्यकतेनुसार कारवाई केली जाणार आहे.
सोशल मीडियावरही लक्ष…
विधिसंघर्षित बालकांना गुन्हेगारीपासून दूर करण्यासाठी पोलिस आयुक्त शिंदे मोहीम राबवण्याची शक्यता आहे. तसेच सोशल मीडियावर सशस्त्र व्हिडिओ अपलोड करून दहशत निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करतील. तलवारीने केक कापणे, रिल्स बनवणे, दादागिरी करणाऱ्यांना शोधण्यासाठी सोशल मीडियावरही गस्त घातली जाणार आहे. या संशयितांना थेट पोलिस ठाण्यात आणल्यास त्यांच्यावर पोलिसांचा वचक राहील, अशी अपेक्षा वर्तवली जात आहे.
हेही वाचा:
- कोल्हापूर : कुदनूर येथील सॉ मिल, ऑईल मिल, फॅब्रिकेटर्स कारखान्याला भीषण आग; लाखोंचे नुकसान
- Menopause : महिलांमध्ये रजोनिवृत्तीचे वय होतेय कमी
- नगर : धनदांडग्यांना साथ, सामान्यांना लाथ का? गायरान जमीनप्रश्नी आ.तनपुरे यांचा संतप्त सवाल
The post नाशिक : गुन्हेगारांची 'कुंडली' होणार मध्यवर्ती appeared first on पुढारी.