
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
प्रत्येक माणसात काही चांगले, काही वाईट दोष असतात. व्यक्तीच्या देहबोलीवरून त्याचा अंदाज बांधता येतो. त्यावरून मी माणसांचे चेहरे वाचतो. अबू सालेमचा खटला सुरू असताना त्याला ‘मृत्यूचा व्यापारी’ असा शब्दप्रयोग केला होता. पण, माझी अँजिओप्लास्टी झाल्यानंतर त्याने दीड पानी पत्र लिहून चौकशी केली होती. थोडक्यात गुन्हेगाराच्या मनात सरकारी वकील आत्मीयता निर्माण करू शकतो याचा विलक्षण अनुभव सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी कथन केला.
अ. भा. मराठी प्रकाशक संघ व कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने लेखक-प्रकाशक चौथ्या साहित्य संमेलनात कुसुमाग्रज स्मारकात आयोजित प्रकट मुलाखतीत निकम बोलत होते. संमेलनाचे स्वागताध्यक्ष विश्वास ठाकूर यांनी मुलाखत घेतली. यावेळी अ. भा. मराठी संघाचे पुणे अध्यक्ष राजीव बर्वे, नाशिकचे अध्यक्ष विलास पोतदार, कार्यवाह सुभाष सबनीस, उपाध्यक्ष वसंत खैरनार, पराग लोणकर आदी उपस्थित होते. युक्तिवाद करताना सुरुवात संस्कृतने करता? यावर उत्तर देताना निकम म्हणाले, खटला सुरू होण्याआधी त्याचा अभ्यास, वाचन, व्याकरण बारकाईने बघावे लागते. न्यायाधीश युक्तिवाद ऐकून कंटाळू शकतो. त्यासाठी आवाजात चढ-उतार असला पाहिजे. त्यासाठी तशी मानसिकता तयार करणे गरजेचे असते. लेखक-प्रकाशकाचे अगदी तसेच असते. सद्यस्थितीत न्यायव्यवस्थेवरचा विश्वास कमी होत चालला आहे का? आजही सर्वसामान्य माणसाची शेवटची आशा न्यायव्यवस्था आहे. टीव्हीवरील चर्चा, वृत्तपत्रात काय दाखवले जाते यावर लोकांची मानसिकता तयार होत असते. सामाजिक ऐक्य टिकवणे ही माध्यमांची जबाबदारी असते. ते जेव्हा जबाबदारी विसरता तेव्हा सामान्य माणसाच्या मनात किंतू निर्माण होतो. कार्यक्रमाच्या प्रारंभी ज्येष्ठ कवी, लेखक प्रवीण दवणे यांना साहित्यसेवा कृतज्ञता पुरस्कार तसेच पॉप्युलर प्रकाशनचे रामदास भटकळ, संमेलनाध्यक्ष अशोक कोठावळे यांना ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. जनस्थानातील साहित्य परंपरा या विषयावर चर्चासत्र घेण्यात आले. रवींद्र मालुंजकर यांनी सूत्रसंचालन केले.
मुलगा अनिकेत निकम यांचा सवाल
यावेळी उज्ज्वल निकम यांचा मुलगा अॅड. अनिकेत निकम उपस्थित होता. प्रसंगी सत्तासंघर्षाच्या राजकारणात तुम्ही याल का? यावर निकम म्हणाले, 25 वर्षांपूर्वी जळगावमधून खासदारकीची ऑफर होती पण राजकारण माझा प्रांत नाही आणि राजकारणात यायचे म्हटल्यावर पैसा खूप लागतो.
गौरव जोशी यांचा सत्कार
संमेलनात माध्यम क्षेत्रातील प्रतिनिधींना लेखक-प्रकाशक साहित्य संमेलनाचे उपाध्यक्ष वसंत खैरनार यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यात दैनिक ‘पुढारी’चे प्रतिनिधी गौरव जोशी यांचा समावेश होता. तसेच गणेश खिरकाडे, नरेश महाजन, मिलिंद चिंधडे, प्रशांत भरवीरकर, बी. जी. वाघ, माहिती व जनसंपर्क विभागाचे माजी संचालक शिवाजी मानकर, उपजिल्हाधिकारी हिरामण झिरवाळ, नरेंद्र जोशी, सुदीप गुजराथी, पीयूष नाशिककर, राजू देसले आदींना गौरविण्यात आले.
हेही वाचा:
- नाशिक : ग्रामपंचायत माघारीसाठी आज अंतिम मुदत
- Cheque Bounce Prevention : चेक बाऊन्सला वचक; धनादेशांना नवे ‘कवच’
- weather today : रत्नागिरी-सिंधुदुर्गात आज-उद्या पाऊस शक्य
The post नाशिक : गुन्हेगारांच्या मनात वकील आत्मीयता निर्माण करू शकतो : अॅड. निकम appeared first on पुढारी.