नाशिक : गॅसजोडणी देण्याच्या नावाखाली ग्रामस्थांची फसवणूक

गॅस www.pudhari.news

नाशिक (दिंडोरी) : पुढारी वृत्तसेवा

धोंडाळपाडा येथे सरकारी योजनेतून गॅसजोडणी मिळवून देण्याची बतावणी करून अनोळखी युवक आणि युवतीने गावातील २५ ते ३० नागरिकांकडून प्रत्येकी ५०० रुपये जमा करून फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार रविवार (दि.११) दुपारी एक अनोळखी युवक आणि युवतीने गावात येऊन सरकारी योजनेतून गॅस एजन्सीमार्फत गॅस शेगडी, सिलिंडरसह नवीन गॅसजोडणी मिळण्यासाठी आता ५०० रुपये भरून द्या, पुढील पंधरा दिवसांत गॅसजोडणी होईल, असे सांगत स्वतःजवळ असलेल्या एक फॉर्मवर लाभार्थ्यांचे नाव, आधार नंबर, मोबाइल नंबर भरून घेतला. तसेच प्रत्येकी ५०० रुपये गोळा केले. ग्रामस्थांना ५०० रुपये घेतल्याची कुठलीही पावती दिली नाही. यात काही नागरिकांनी रोख स्वरूपात, तर काहींनी ऑनलाइन पद्धतीने पैसे अदा केले आहेत. त्यानंतर गावातील काही जागरूक युवकांच्या हा प्रकार लक्षात आल्याने त्यांनी गॅस जोडणीबाबत माहिती घेतली तेव्हा शासकीय पातळीवर अशी कोणतीच योजना नसल्याचे समोर आले. तसेच दिंडोरीत तुमचे कार्यालय कोठे आहे अशी विचारणा केल्यानंतर त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देत चुकीचा पत्ता दिला. त्यामुळे युवकांनी दिंडोरीत पत्त्याबाबत चौकशी केली असता त्यांनी सांगितलेले ठिकाणच अस्तित्वात नसल्याचे निष्पन्न झाले. विशेष म्हणजे गावातील युवकांकडून याबाबत खोलवर चौकशी सुरू झाल्याने या जोडीने जमा झालेले पैसे घेऊन गावातून पळ काढला. त्यानंतर त्यांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला असता नंबरही बंद येत आहे. त्यामुळे फसवणूक झाल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात आले. दरम्यान, परिसरातील इतर गावांमध्येही शासकीय योजनांचा लाभ मिळवून देतो, असे सांगत कोणी अनोळखी व्यक्ती पैसे गोळा करताना आढळून आल्यास ग्रामस्थांनी पैसे देऊ नये तसेच स्थानिक पोलिसपाटील यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन धोंडाळपाडा येथील पोलिसपाटील भारती हिंडे आणि बाडगीचा पाडा येथील पोलिसपाटील शंकरराव तुंगार यांनी केले आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : गॅसजोडणी देण्याच्या नावाखाली ग्रामस्थांची फसवणूक appeared first on पुढारी.