Site icon

नाशिक : गोदाघाटावर 60 फुटी रावणदहन

नाशिक, पंचवटी : पुढारी वृत्तसेवा
गोदाघाटावरील रामकुंड परिसरात उभारण्यात आलेल्या रावणाच्या 60 फुटी प्रतीकात्मक पुतळ्याचे मोठ्या जल्लोषात दहन करण्यात आले. गेल्या पाच दशकांपासून चतुःसंप्रदाय आखाड्याच्या श्री व्यंकटेश बालाजी मंदिराच्या वतीने विजयादशमीला गोदाघाटावर रावणदहन केले जाते.

रावणदहनाच्या परंपरेचे यंदाचे 55 वे वर्ष होते. दरवर्षीप्रमाणे यंदाही 60 फूट उंचीचा रावणाचा प्रतीकात्मक पुतळा उभारण्यात आला होता. आखाड्याचे तत्कालीन महंत दीनबंधुदास महाराज यांनी सुरू केलेली रावणदहनाची परंपरा महंत कृष्णचरणदास महाराज यांनी आजपर्यंत सुरू ठेवली आहे. गेली दोन वर्षे कोरोना निर्बंधामुळे ही परंपरा खंडित झाली होती. यंदा मात्र मोठ्या उत्साहात रावणदहन करण्यात आले. रावणदहनापूर्वी वानरसेनेसह राम, लक्ष्मण, हनुमान, रावण, बिभिषण यांची वेशभूषा असलेली पारंपरिक मिरवणूक काढण्यात आली होती. रावणदहनानंतर रामकुंड परिसरात फटाक्यांची आकर्षक आतषबाजी करण्यात आली.

यावेळी चतुःसंप्रदाय आखाड्याचे महंत कृष्णचरणदास महाराज, पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे, सहपोलिस आयुक्त गंगाधर सोनवणे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे, पद्माकर पाटील, नंदू पवार, सतीश शुक्ल, राम शिंदे, लक्ष्मण कोठावदे, छोटू आढळकर, हनुमान घोडके, सागर कापसे, कृष्णकांत नेरकर, रवि आवारकर, श्याम गंदे, नंदकुमार बैरागी, सोनू बि—जवासी यांच्यासह मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चौंडेश्वरी मंडळाच्या वतीनेही कार्यक्रम
चौंडेश्वरी देवी सांस्कृतिक मित्रमंडळाच्या वतीनेही रावणदहनाचा कार्यक्रम करण्यात आला. यंदा माजी स्थायी समिती सभापती उद्धव निमसे यांच्या हस्ते रावणदहनाचा कार्यक्रम झाला. यावेळी मंडळाचे अध्यक्ष शंकर वाडेकर, मंडळाचे सर्व पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.

The post नाशिक : गोदाघाटावर 60 फुटी रावणदहन appeared first on पुढारी.

Exit mobile version