नाशिक : गोदामासह तीन घरे आगीत खाक

घोटी www.pudhari.news

नाशिक (घोटी) : पुढारी वृत्तसेवा
शहरातील कुंभार गल्लीत शनिवारी (दि. 14) हार्डवेअर गोदामाला पहाटे 3 च्या दरम्यान आग लागून गोदामालगतची तीन घरे खाक झाली. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

जुने लाकडी बांधकाम असलेल्या आरिफ रंगरेज यांच्या हार्डवेअर गोदामाला पहाटे 3 च्या दरम्यान शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. गोदामामध्ये असलेले रंगाचे प्लास्टिक डबे, थिनरच्या डब्यांना काही क्षणांत आग लागून गोदामातील लाकडी साधनसामग्रीने पेट घेतला. गोदामालगतच राहात असलेल्या सईद रंगरेज यांना आग लागल्याचे लक्षात येताच त्यांनी आरडाओरडा करत गल्लीतील नागरिकांना जागे केले. उपसरपंच श्रीकांत काळे यांनी आपल्या मित्रमंडळासह घटनास्थळी धाव घेत पोलिस प्रशासन, अग्निशमन दलाच्या जवानांना बोलाविले. गल्लीतील सतर्क नागरिकांनी आपल्या परिसरात नळ सुरू करून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. परंतु, आगीने रौद्र रूप धारण केल्याने जवळच असलेल्या सईद रंगरेज, नाजीम मणियार, आदम तांबोळी यांच्या घरांना आग लागली. आगीने वरच्या मजल्याला घेरल्याने हे कुटुंबीय तत्काळ घराबाहेर पडले त्यामुळे जीवितहानी टळली. सोमनाथ चव्हाण यांच्या नवीन घराचे कामकाज सुरू असल्याने त्यांनी गोदामामध्ये डीजे साहित्य, लॅपटॉप, घरगुती साहित्य ठेवले होते. हे सर्व साहित्यही आगीत भस्मसात झाले. आरिफ रंगरेज यांची पाच लाख रुपयांची रोकड, तर 15 लाख रुपयांचे हार्डवेअरचे साहित्य खाक झाले. घटनेची माहिती मिळताच महिंद्राचे सुरक्षा सल्लागार हरीश चौबे यांनी परिसरातील वीजपुरवठा खंडित करत अग्निशमन बंबाच्या साहाय्याने सकाळी 8.30च्या दरम्यान आग आटोक्यात आणली. अ‍ॅड. शकुंतला गवारी, गजानन गवारी, कुणाल भागवत, संदीप अंदाडे, अझर अत्तार यांनीही आग विझविण्यासाठी मदत केली. तहसीलदार परमेश्वर कासुळे यांनी पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.

हेही वाचा:

The post नाशिक : गोदामासह तीन घरे आगीत खाक appeared first on पुढारी.