नाशिक : गोदावरीला पहिला पूर ; प्रशासनातर्फे रहिवासी-व्यावसायिकांना सतर्कतेचा इशारा

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा
पाच दिवसांपासून सुरू असलेल्या संततधारेमुळे गंगापूर धरणाच्या पाणीपातळीत वाढ झाल्यामुळे सोमवारी (दि.11) दुपारनंतर धरणातून विसर्ग सुरू झाला आहे. त्यामुळे गोदावरीला यंदाच्या पावसाळ्यातील पहिला पूर आला आहे. नदीकाठच्या रहिवासी व व्यावसायिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. आपत्ती व्यवस्थापन व निवारण कक्षाने गोदावरी नदीकाठावरील झोपड्या आणि गोदाघाट-रामकुंड परिसरातील टपर्‍या हटविल्या आहेत. येथील रहिवाशांचे स्थलांतर करण्यात आले आहे.

दमदार पावसामुळे गंगापूर धरण सध्या 67 टक्के भरले आहे. सार्वजनिक पाटबंधारे विभागाकडून धरणातून सोमवारी (दि. 11) सायंकाळी 6 वाजता 10045 क्यूसेक पाणी गोदापात्रात सोडण्यात आले. त्यामुळे यावर्षी जुलै महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यात गोदावरीला पहिला पूर आला आहे. नदीवरील लहान पूल व नदीलगतची घरे पाण्याखाली जाण्याची शक्यता असल्याने पंचवटी पोलिस आणि जिल्हा प्रशासन आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून पंचवटी-रामकुंड व गोदाघाट परिसरात सर्वत्र ध्वनिक्षेपकाद्वारे सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

पुराचा धोका लक्षात घेऊन मनपा पंचवटी विभागीय अधिकारी यांच्या उपस्थितीत सोमवारी (दि.11) गोदावरी नदीच्या काठावरील गौरीपटांगणातील व परिसरातील झोपड्या हटविण्यात आल्या. येथील बेघर रहिवाशांना संत गाडगेबाबा धर्मशाळा आणि मनपाच्या निवारा शेडमध्ये स्थलांतरित करण्यात आले. यासाठी पंचवटी विभागीय अधिकारी कैलास राभडिया, बांधकाम विभागाचे शाखा उपअभियंता प्रकाश निकम, प्रदीप भामरे, समीर रकटे, सहायक अधीक्षक राजेश सोनवणे, स्वच्छता निरीक्षक संजय दराडे, अग्निशमन दलाचे संजय कानडे, अतिक्रमण विभागाचे कर्मचारी आदी सहभागी होते.

सतर्कतेचा इशारा
घनकचरा व्यवस्थापन विभाग विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय दराडे व पथकाने वाल्मीकनगर, बुरुड वस्ती भागात जाऊन तेथील रहिवाशांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

मनपा आयुक्तांकडून पाहणी
गोदावरी नदीपात्रात पाण्याची पातळी वाढताच सोमवारी (दि.11) दुपारी 12 ते 12.30 दरम्यान मनपा आयुक्त रमेश पवार, उपआयुक्त मुंडे, शहर अभियंता वंजारी आदींनी गोदाघाट परिसरात पाहणी केली व संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांना सूचना केल्या.

नाले-ओहोळ वाहतात दुथडी
चार ते पाच दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे पंचवटीतील लहान-मोठे नाले, ओहोळ दुथडी वाहत आहेत. वाघाडीसह मखमलाबाद रोडवरील लेंडी नाल्यातूनही मोठ्या प्रमाणात पाणी गोदावरीत वाहत आहे. मखमलाबाद रोडवरील नाल्यालगतचे बाभळीचे जुने झाड उन्मळून पडले.

शहरातील सर्व मुख्य रस्ते जलमय, वाहनधारकांची कसरत
पंचवटीतील मखमलाबाद रोड, पेठ रोड, दिंडोरी रोड, डॉ. नानासाहेब धर्माधिकारी रिंग रोड हे मुख्य रस्ते जलमय झाले आहेत. या रस्त्यांवर ठिकठिकाणी पाण्याची डबकी साचली आहेत. येथून मार्गक्रमण करताना वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांवर खड्डे पडल्याने वाहनचालकांची कसरत होत आहे. पाणी साचलेल्या रस्त्यांमधून मार्ग काढताना इंजिनमध्ये पाणी शिरल्याने अनेक दुचाकी बंद पडल्या.

हेही वाचा :

The post नाशिक : गोदावरीला पहिला पूर ; प्रशासनातर्फे रहिवासी-व्यावसायिकांना सतर्कतेचा इशारा appeared first on पुढारी.