नाशिक : गोदावरी प्रदूषणमुक्तीसाठी आयआयटीचे पथक दाखल

गोदावरी,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

गोदावरीसह तिच्या चार उपनद्या आणि ६७ नैसर्गिक नाल्यांच्या प्रदूषणमुक्तीसाठी आयआयटी पवईच्या शास्त्रज्ञांचे पथक मंगळवारी (दि.१०) नाशिकमध्ये दाखल झाले. महापालिकेच्या अधिकाऱ्यांसह पथकातील दोघा अभ्यासकांनी प्राथमिक सर्वेक्षणाला सुरुवात केली. सर्वेक्षणाअंती व्यवहार्यता तपासणी अहवाल मनपा आयुक्तांना सादर करण्यात येणार आहे.

आयआयटी पवईने मिठी नदीचे सर्वेक्षण करून प्रदूषणमुक्तीसाठी उपाययोजना सादर केल्या होत्या. त्याच धर्तीवर नाशिक महापालिकेने गोदावरी व तिच्या उपनद्यांच्या प्रदूषण दूर व्हावे, यासाठी नमामि गोदा प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला आहे. सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी सल्लागार संस्थेची नियुक्ती करण्यात आली आहे. अहवाल तयार करण्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी लागणार असून, केंद्राच्या मंजुरीने योजनेची अंमलबजावणी होणार आहे. त्यासाठी बराच कालावधी लागणार असल्याने मिठी नदीचे सर्वेक्षण करणाऱ्या आयआयटी पवईशी मनपा आयुक्तांनी चर्चा करून गोदावरी नदी, नासर्डी, वालदेवी, वाघाडी या उपनद्या आणि नैसर्गिक नाल्यांच्या प्रदूषणमुक्तीसाठी उपाययोजना सुचविण्यासाठी सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

मंगळवारी (दि.१०) आयआयटी पवईचे श्रीधर गढवाल व आशिष साळुंखे या दोन अभ्यासकांचे पथक नाशिकमध्ये दाखल झाले. या पथकामार्फत उपनद्या आणि त्यांना जोडलेल्या नैसर्गिक नाल्यांचे प्राथमिक सर्वेक्षण केले जाणार आहे. दोन दिवस प्राथमिक सर्वेक्षण करून पथक मुंबईकडे रवाना होणार आहे. त्यानंतर वरिष्ठ शास्त्रज्ञांशी चर्चा करून सविस्तर सर्वेक्षणासाठी पथक पुन्हा नाशिकला येणार आहे. सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर व्यवहार्यता तपासणी अहवाल आयुक्तांना सादर केला जाणार आहे.

हेही वाचा : 

The post नाशिक : गोदावरी प्रदूषणमुक्तीसाठी आयआयटीचे पथक दाखल appeared first on पुढारी.