नाशिक : गोदेसह उपनद्या ऑक्सिजन प्लांटद्वारे प्रदूषणमुक्त करणार

गोदावरी नाशिक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
गोदावरीसह तिच्या उपनद्यांमधील प्रदूषण रोखण्यासाठी तसेच पाण्यातील ऑक्सिजनची मात्रा वाढविण्यासाठी कोविड सेंटरच्या ठिकाणी उभारलेल्या ऑक्सिजननिर्मिती प्लांटचा वापर केला जाणार आहे. सांडपाणी तसेच मलजलावर प्रक्रिया करणार्‍या एसटीपी सेंटरच्या ठिकाणी हे प्लांट उभारण्यात येणार असून, त्यासाठी नागपूर येथील ओझोन संशोधन संस्थेची मदत घेतली जाणार आहे.

कोरोना महामारीच्या पहिल्या आणि दुसर्‍या लाटेत बहुतांश सर्वच नागरिकांना अनेक संकटांचा सामना करावा लागला. पहिल्या दोन लाटांमध्ये मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्याने कोरोनाच्या अनेक रुग्णांना प्राणांना मुकावे लागले. यामुळे प्रशासनाने त्याची दखल घेत संभाव्य कोरोना महामारीच्या लाटांना तोंड देण्यासाठी मनपाचे नवीन बिटको रुग्णालय तसेच डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयांसह सात कोविड केअर सेंटरच्या ठिकाणी ऑक्सिजन मॅनेजमेंट प्लांट उभारले. हवेतून ऑक्सिजनचीनिर्मिती करणार्‍या या प्लांटमुळे ऑक्सिजनची कमतरता दूर झाली. परंतु, संभाव्य तिसरी आणि चौथी लाट न आल्याने आजमितीस बहुतांश सर्वच ठिकाणचे पीएसए प्लांट पडून आहेत. त्यामुळे या प्रकल्पांद्वारे निर्माण होणार्‍या ऑक्सिजनचा वापर गोदावरी नदीतील प्रदूषण दूर करण्यासाठी करण्यात येणार आहे. गोदावरी नदीला अनेक नाले तसेच उपनद्यांचे पाणी येऊन मिसळते. यात मलजल तसेच सांडपाण्याचे प्रमाण अधिक असल्याने गोदावरीच्या प्रदूषणामध्ये वाढ होत आहे. हे प्रदूषण दूर करण्यासाठी पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढविण्याच्या दृष्टीने महापालिका शहरातील प्रत्येक मलजलयुक्त नाला तसेच मलजलशुद्धीकरण केंद्राच्या (सिव्हरेज ट्रिटमेंट प्लांट) ठिकाणी पीएसए अर्थात हवेतून ऑक्सिजननिर्मिती करणारा प्रकल्प उभारणार आहे.

नवीन बिटको रुग्णालय आणि डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयातील ऑक्सिजन प्लांट ‘जैसे थे’ ठेवण्यात येणार असून, सिडकोतील रायगड चौकातील श्री बाळासाहेब ठाकरे सेंटर, संभाजी स्टेडियम, स्व. मीनाताई ठाकरे स्टेडियम, ठक्कर डोम, अंबड आयटी आणि मायको सातपूर या सात ठिकाणचे प्रकल्प एसटीपी सेंटर तसेच मलजल वाहून नेणार्‍या नाल्याच्या ठिकाणी बसविण्यात येणार आहे. या ठिकाणी पीएसए प्लांटमधून मलजलयुक्त पाणी तसेच सांडपाण्यात ऑक्सिजन मिसळून पाणी शुद्ध करण्यात येणार आहे. या प्रकल्पाचे संचलन आणि देखभाल दुरुस्तीकरता नागपूर येथील ओझोन संशोधन व अनुप्रयोग संस्थेची मदत घेतली जाणार आहे. यासंदर्भात मनपाने प्रस्ताव संबंधित संस्थेकडे सादर केला आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : गोदेसह उपनद्या ऑक्सिजन प्लांटद्वारे प्रदूषणमुक्त करणार appeared first on पुढारी.