नाशिक : गौतमी पाटील कार्यक्रमातील वाद, पत्रकारांना मारहाण करणाऱ्यांसह आयोजकांविरोधात गुन्हे

गौतमी पाटील

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शहरातील ठक्कर डोम येथे प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटील यांच्या लावणीच्या कार्यक्रमात एका टोळक्याने गोंधळ घालून प्रसारमाध्यमांच्या दोन प्रतिनिधींना मारहाण केल्याची घटना मंगळवारी (दि.१६) रात्री घडली. या प्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात टोळक्याविराेधात महाराष्ट्र प्रसारमाध्यमातील व्यक्ती व प्रसारमाध्यम संस्था (हिंसक कृत्ये व मालमत्तेचे नुकसान किंवा हानी यांना प्रतिबंध) कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. तर कार्यक्रमाच्या आयोजकांविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मंगळवारी (दि.१६) त्र्यंबक रोडवरील ठक्कर डोम येथे नवनिर्माण सेवाभावी संस्थेच्या वतीने गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी वृत्तवाहिनीचे कॅमेरामन आकाश येवले कार्यक्रमाचे शूटिंग घेत असताना २० ते २५ वयोगटातील पाच ते सहा युवकांनी त्यांच्यासह छायाचित्रकार अशोक गवळी यांच्यावर हल्ला केला. हल्लेखोरांनी येवले यांच्यासह गवळी यांना मारहाण केली. यात त्यांच्याकडील कॅमेऱ्याचे नुकसान झाले आहे. दोघा जखमी पत्रकारांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. गंगापूर पोलिस ठाण्यात आकाश येवले यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कार्यक्रम स्थळावरील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी पाच संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्याप्रमाणे कार्यक्रमस्थळी सुरक्षारक्षक नेमण्यासोबतच सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून योग्य खबरदारी घेण्याच्या सूचना पोलिसांनी केल्या होत्या. मात्र, आयोजकांनी सूचनांचे पालन न केल्यामुळे त्यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा : 

The post नाशिक : गौतमी पाटील कार्यक्रमातील वाद, पत्रकारांना मारहाण करणाऱ्यांसह आयोजकांविरोधात गुन्हे appeared first on पुढारी.