
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
दुसर्या टप्प्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम अखेर जाहीर झाला असून, येत्या ऑक्टोबर महिन्यात 13 ऑक्टोबर रोजी मतदान होणार असून, 14 ऑक्टोबरला मतमोजणी पार पडणार आहे. यंदा थेट जनतेतून सरपंचपदाची निवडणूक होणार असून, या निवडणुकांबाबत जनतेला मोठी उत्सुकता आहे. जिल्ह्यातील इगतपुरी, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर, पेठ या तालुक्यातील एकूण 194 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होतील.
राज्य सरकारने सरपंच निवडीबाबत काही दिवसांपूर्वी मोठा निर्णय घेतला होता. सरपंचाची निवडणूक ही थेट जनतेतून होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यांतील 194 ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 13 ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली असून, 14 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होईल, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्तांनी केली आहे.
जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार संबंधित तहसीलदार 13 सप्टेंबर 2022 रोजी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील. नामनिर्देशनपत्र 21 ते 27 सप्टेंबर या कालावधीत दाखल करण्यात येतील. शनिवार व रविवारच्या सुटीमुळे 24 व 25 सप्टेंबर रोजी नामनिर्देशनपत्र दाखल करता येणार नाहीत. नामनिर्देशनपत्रांची छाननी 28 सप्टेंबर रोजी होईल. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत 30 सप्टेंबर 2022 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत असेल. त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप होईल. मतदान 13 ऑक्टोबर रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल. नक्षलग्रस्त भागात दुपारी 3 पर्यंतच मतदानाची वेळ असेल. मतमोजणी 14 ऑक्टोबर 2022 रोजी होईल. समर्पित मागासवर्ग आयोगाने शिफारस केलेल्या टक्केवारीच्या प्रमाणात या निवडणुकांसाठी नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या जागा देय आहेत.
सध्या राज्यात विविध विषयांवरून राजकीय वातावरण तापलेले असल्याने, या निवडणुकांकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे. तसेच थेट जनतेतून सरपंच निवडून येणार असल्याने, या निवडणुकीला अत्यंत महत्त्व प्राप्त झाले आहे.
तालुक्यातील ग्रामपंचायती
इगतपुरी 5
सुरगाणा 61
त्र्यंबकेश्वर 57
पेठ 71
हेही वाचा :
- कोल्हापूर : गंगावेसमधून पंचगंगेकडे ‘नो एंट्री’
- सरपंचपद : 103 जणांची माघार; ग्रामपंचायत निवडणुकीत सदस्यपदासाठीचे 234 अर्ज घेतले मागे
- नाशिक : लाच स्वीकारणारा पोलीस नाईक लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात
The post नाशिक : ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल; 13 ऑक्टोबर रोजी मतदान; 14 ला मतमोजणी appeared first on पुढारी.