
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमधील सदस्यपदांच्या पोटनिवडणुकांसाठी साेमवारी (दि. ८) माघारीची अंतिम मुदत आहे. त्यामुळे निवडणुकीतून कोण माघार घेणार याकडे अवघ्या जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.
जिल्ह्यातील १५ तालुक्यांमधील २३३ ग्रामपंचायतींमधील ३४३ रिक्तपदांसाठी तसेच ६ गावांतील थेट सरपंचपदाकरिता निवडणूक कार्यक्रम सुरू आहे. सदस्यपदांसाठी जिल्हाभरातून २७८ अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी २७१ अर्ज वैध ठरले असून, ७ अर्ज तांत्रिक कारणास्तव बाद केले. सरपंचपदासाठी ६ अर्ज दाखल आहेत. निवडणुकीत सोमवारी (दि. ८) दुपारी तीनपर्यंत माघारीची अंतिम मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर लगेचच रिंगणातील अंतिम उमेदवारांना निवडणूक चिन्हाचे वाटप केले जाणार आहे.
गेल्या महिनाभरापासून विविध कारणांनी जिल्ह्यातील राजकारण तापून निघाले आहे. त्यामध्येच झालेल्या बाजार समित्यांच्या निवडणुकांमध्ये सत्ताधारी व विरोधकांनी आरोप-प्रत्यारोपांची एकही संधी सोडली नव्हती. अशातच ग्रामपंचायत पोटनिवडणुकांचा रणसंग्राम असून, सर्वच राजकीय पक्षांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. त्यामुळे निवडणुकीतून कोण माघार घेणार व कोण अंतिमत: रिंगणात राहणार याचे चित्र माघारीनंतरच स्पष्ट होईल.
हेही वाचा :
- The Kerala Story : अदा शर्मा तर ‘हिंदू शेरनी’, अभिनेत्रीने खुलं चॅलेंज दिल्यानंतर ट्विट व्हायरल
- राज ठाकरे फुले, शाहू, आंबेडकरांचे नाव का घेत नाहीत? छगन भुजबळांचा सवाल
The post नाशिक : ग्रामपंचायत माघारीसाठी आज अंतिम मुदत appeared first on पुढारी.