नाशिक : ग्रामीण विद्यार्थिनींचा सायकल प्रवास सुखकर, शासनाकडून अनुदानात दीड हजाराची वाढ

मुलींना सायकल वाटप(संग्रहित फोटो),www.pudhari.news

नाशिक : गौरव जोशी
जिल्हा नियोजन मानवविकास उपक्रमांंतर्गत आदिवासी विद्यार्थिनींना देण्यात येणार्‍या सायकलच्या अनुदानात शासनाने तब्बल दीड हजार रुपयांची भरघोस वाढ केली आहे. त्यामुळे सायकल खरेदीसाठी पाच हजार रुपयांचे अनुदान मिळणार असल्याने विद्यार्थिनींचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे.

आदिवासी भागातील आठवी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थिनींना घरापासून शाळा-महाविद्यालयांत जाण्या-येण्यासाठी शासन स्तरावरून सायकलींचे वितरण करण्यात येते. जिल्हा मानवविकास उपक्रमांंतर्गत दरवर्षी हे वितरण केले जाते. त्यासाठी मानव विकासमधून प्रत्येक आदिवासी तालुक्याला मंजूर केल्या जाणार्‍या निधीच्या 10 टक्के रक्कम ही सायकल खरेदीसाठी राखीव ठेवण्यात येते. शाळा-महाविद्यालये सुरू झाल्यानंतर विद्यार्थिनींना दोन टप्प्यांत अनुदान दिले जाते. त्यामध्ये पहिल्या टप्प्यात सुमारे 50 टक्के अनुदान विद्यार्थिनींच्या बँक खात्यात वर्ग करण्यात येते. त्यानंतर विद्यार्थिनींनी सायकल खरेदीचे बिल शाळेत जमा केल्यावर उर्वरित रक्कम बँक खात्यावर जमा होते.

कोरोना महामारीच्या संकटामुळे मागील दोन वर्षांपासून शाळा बंद असल्याने सायकल वितरणाला ब—ेक लागला होता. पण, यंदाच्या वर्षी कोरोनाचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर पुन्हा एकदा शाळा-महाविद्यालये गजबजली आहेत. त्यामुळे आदिवासी भागातील विद्यार्थिनींना सायकल वितरण करण्यासाठी पुन्हा एकदा प्रशासन तयारीला लागले आहे. जिल्ह्यातील पेठ, सुरगाणा, कळवण, नांदगाव, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, दिंडोरी व सटाणा आदी तालुक्यांमध्ये सायकल वितरित करण्यात
येणार आहे.

जिल्ह्यातील आठ आदिवासी तालुक्यांमधील आठवी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थिनींना सायकल वितरित केली जाते. त्यासाठी शालेय विभाग प्रस्ताव आल्यानंतर आपण त्यांना सायकलींसाठी निधी उपलब्ध करून देत असतो. प्रत्येक तालुक्याला सुमारे 20 लाखांचा निधी राखीव असून, त्यातून अंदाजे 400 विद्यार्थिनींना सायकल वितरित केल्या जातील.
– हेमंत अहिरे, जिल्हा नियोजन अधिकारी,
मानव विकास

अंदाजे 400 सायकलींचे वाटप
जिल्ह्यातील आदिवासी तालुक्यांसाठी मानवविकास अंतर्गत दोन कोटींचा निधी देण्यात येतो. या निधीच्या 10 टक्के म्हणजेच 20 लाख रुपये हे सायकल वितरणासाठी राखीव ठेवण्यात येणार आहे. या अनुदानांतून आठही तालुक्यांतील प्रत्येकी 400 विद्यार्थिनींना सायकल उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : ग्रामीण विद्यार्थिनींचा सायकल प्रवास सुखकर, शासनाकडून अनुदानात दीड हजाराची वाढ appeared first on पुढारी.