नाशिक : घंटागाडीच्या जुन्याच ठेकेदारांना पुन्हा मुदतवाढ

नाशिक घंटागाडी ठेका,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महापालिकेतील 354 कोटींच्या घंटागाडी ठेक्याचा कार्यारंभ आदेश देण्याची तयारी सुरू असतानाच आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी जुन्याच ठेकेदारांना अनिश्चित काळाकरिता मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. नवीन ठेक्याच्या निविदा प्रक्रियेची फाइल तपासणीनंतर लेखापरीक्षण विभागाकडून आयुक्तांकडे प्राप्त होऊनही आयुक्तांनी जुन्याच ठेकेदारांना मुदतवाढीचा निर्णय का घेतला, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

आयुक्तांच्या या भूमिकेमुळे जुन्या ठेकेदारांना चाल देण्यात आली आणि कोटीच्या कोटी उड्डाणे घेतलेल्या नव्या ठेक्याची चौकशी होणार असल्याचे बोलले जात आहे. जुन्या घंटागाडीचा ठेका पाच वर्षांसाठी 176 कोटींचा होता, तर आता नव्याने प्रक्रिया सुरू असलेला ठेका थेट 354 कोटींवर पोहोचला आहे. यामुळे खरे तर पहिल्यापासूनच हा ठेका वादात सापडला होता. जुन्या ठेक्याची मुदत सप्टेंबर 2021 मध्ये संपुष्टात आली. नवीन ठेक्यासाठी मनपातील काही अधिकार्‍यांनी विशिष्ट ठेकेदारांच्या सहभागासाठी निविदा अटी-शर्तींत फेरबदल केल्यानेदेखील वाद निर्माण झाला होता. असे असताना तेव्हाच्या आयुक्तांनी संबंधित ठेकेदारांना पाठबळ देत निविदा प्रक्रिया पूर्ण करत सहा विभागांसाठी चार ठेकेदारांची निवड करण्यात आली. त्यानुसार नाशिकरोडसाठी तनिष्क सर्व्हिसेस, नाशिक पश्चिम व सिडको विभागासाठी काम वॉटरग्रेस, सातपूर व पंचवटी विभागासाठी ए. जी. एनरिवो इन्फ्रा, तर नाशिक पूर्वसाठी मे. सय्यद असिफ अली या कंपन्या पात्र ठरल्या आहेत.

ठेक्यासाठी ठेकेदारांनी बँक गॅरंटी, बँक सॉल्व्हन्सी तसेच दिलेल्या कागदपत्रांची पुन्हा तपासणी तसेच घंटागाडीसाठी असलेली तरतूद, तरतुदीनुसार निविदा प्रक्रिया आहे किंवा नाही याबाबत तपासणी करण्यात येणार असून, नवीन घंटागाडी ठेका चौकशीच्या फेर्‍यात अडकण्याची शक्यता आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : घंटागाडीच्या जुन्याच ठेकेदारांना पुन्हा मुदतवाढ appeared first on पुढारी.