नाशिक : घंटागाडीत आढळली ‘नकोशी’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महापालिकेच्या पाथर्डी फाटा येथील खत प्रकल्पात शुक्रवारी (दि.28) स्त्रीजातीचे मृत अर्भक आढळून आले आहे. या ‘नकोशी’ला एका गोणीत गुंडाळून घंटागाडीत टाकल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर महापालिकेच्या वैद्यकीय पथकाने घटनास्थळी भेट देऊन अर्भकाची पाहणी केली असता, हे अर्भक अंदाजे 30 ते 32 आठवड्यांचे असल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनैतिक संबंधातून गर्भवती झाल्यानंतर संशयिताने हे अर्भक टाकल्याचा अंदाज वर्तवण्यात येत असून, पोलिस या मातेचा शोध घेत आहेत.

शुक्रवारी,दि.28 सकाळच्या सुमारास कचरावेचक घंटागाडीतून आलेल्या कचर्‍याचे विलगीकरण करत होते. त्यावेळी यशवंत नवात्रे यांना एक संशयास्पद पिशवी आढळून आली. पिशवीची पाहणी केली असता त्यात कापडात गुंडाळून ठेवलेले अर्भक आढळून आले. त्यामुळे कचरावेचकाने हा प्रकार खत प्रकल्पावरील अधिकार्‍यास सांगितला. त्यानंतर संबंधित अधिकार्‍याने घनकचरा संचालक डॉ. आवेश पलोड यांना माहिती दिली. महापालिकेचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापूसाहेब नागरगोजे, डॉ. पलोड, डॉ. प्रशांत शेट्ये, बालरोगतज्ज्ञ डॉ. विनोद पावस्कर यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. तसेच याबाबत इंदिरानगर पोलिसांनाही घटनेची माहिती दिली. महापालिकेच्या डॉक्टरांच्या पथकाने तपासणी केली असता, सदरचे स्त्री अर्भक हे 30 ते 32 आठवड्यांचे असून, 24 तासांच्या आतच जन्माला आले असल्याचे समोर आले आहे. प्राथमिक तपासणीनंतर हे अर्भक पोलिसांना सुपूर्द करण्यात आले. या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. या प्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात भास्कर रघुनाथ बोराडे (50, रा. पाथर्डी फाटा) यांच्या फिर्यादीनुसार, अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पूर्व विभागातील अर्भक?
महापालिकेच्या या खत प्रकल्पावर दोनशे घंटागाड्या येत असून, नेमक्या कोणत्या घंटागाडीतून हे अर्भक या ठिकाणी आले, याचा पालिकेतर्फे शोध सुरू आहे. 11 ते 12 वाजेच्या दरम्यान पंचवटी आणि नाशिक पूर्व या विभागातून आठ ते 10 घंटागाड्या येथे आल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये समोर आले आहे. त्यात कचर्‍याच्या वर्गीकरणावरून अर्भक हे नाशिक पूर्व विभागाच्या घंटागाडीतून आल्याचे प्राथमिक चौकशीतून समोर आले आहे.

खत प्रकल्पावर कचरा विलगीकरण करताना, एका कचरावेचकाला पिशवीत स्त्री जातीचे मृत अर्भक आढळून आले आहे. संशयितांनी कचरा टाकताना घंटागाडीत अर्भक टाकले असून, या प्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. – डॉ. आवेश पलोड, संचालक घनकचरा व्यवस्थापन.

अनैतिक संबंधातून प्रकार? 

अनैतिक संबंधातून महिला गर्भवती राहिल्याने त्यांनी नवजात अर्भकाची विल्हेवाट लावल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. त्याचप्रमाणे अर्भक रुग्णालयाऐवजी घरीच जन्माला आल्याचा संशय असून, जन्मानंतर ओळख लपवण्यासाठी ते पिशवीत गुंडाळून घंटागाडीत टाकल्याची शक्यता आहे. त्यामुळे काही माहिती असल्यास त्यांनी इंदिरानगर पोलिस ठाणे येथे 0253-2328833 / 9464644914 या क्रमांकावर अथवा email id- [email protected] यावर संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : घंटागाडीत आढळली ‘नकोशी’ appeared first on पुढारी.