नाशिक : पुढारी वृत्तसेवा
पंचवटी व सातपूर विभागातील घंटागाडी ठेक्यासंदर्भातील तक्रारींवरून नियुक्त करण्यात आलेल्या चौकशी समितीचा अहवाल अद्यापही गुलदस्त्यातच असून, आणखी १५ दिवसांचा अवधी लागण्याची शक्यता चौकशी समितीतील प्रमुख अधिकाऱ्यांकडून वर्तविली जात आहे. दोन महिने उलटून देखील अहवाल सादर केला जात नसल्याने, ठेकेदाराला अभय देण्यासाठी तर विलंब केला जात नसावा ना असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
महापालिकेचे तत्कालिन प्रभारी आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी मार्च महिन्यात प्रभारी पद्भभार स्विकारल्यानंतर घंटागाडीबाबतच्या प्राप्त तक्रारींची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. तसेच आठ दिवसात याबाबतचा अहवाल सादर करण्याच्याही सूचना दिल्या होत्या. त्यानुसार वित्त व लेखा अधिकारी नरेंद्र महाजन, यांत्रिकी विभागाचे अधीक्षक अभियंता उदय धर्माधिकारी, कार्यकारी अभियंता बाजीराव माळी व घनकचरा व्यवस्थापन संचालक डॉ. कल्पना कुटे यांची चौकशी समिती स्थापन केली होती. अनियमित घंटागाडी येणे, नियोजित मार्गावर घंटागाडी न धावणे, घंटागाडीवर जीपीएस न बसविणे, कचरा विलगीकरण न होणे यासंदर्भातील तक्रारींची समितीच्या माध्यमातून चौकशी केली जाणार होती. पंचवटी व सातपूर विभागात अडीच टन घंटागाडी ऐवजी सहाशे किलो क्षमतेच्या घंटागाड्या चालविल्या जात असल्याचीही तक्रार प्राप्त असल्याने समितीकडून प्रत्यक्ष फिल्डवर जावून याबाबतची पाहणी केली जाणार होती.
दरम्यान, समितीच्या माध्यमातून आॅन फिल्ड चौकशी केली गेली. मात्र, याबाबतचा अहवाल अद्यापही समोर आला नसल्याने, चर्चांना उधान आले आहे. प्रभारी आयुक्त गमे यांनी, आठच दिवसात अहवालन सादर करण्याचे आदेश दिले होते. मात्र, दोन महिने उलटून देखील अहवाल सादर केला जात नसल्याने चौकशी समितीवरच आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
आॅन फिल्ड चौकशी पूर्ण झाली असून, याबाबतचा अहवाल आयुक्तांना सादर केला जाणार आहे. मात्र, याकरिता आणखी १५ दिवसांचा अवधी लागण्याची शक्यता आहे. सध्या त्यावर काम सुरू आहे.
– उदय धर्माधिकारी, अधीक्षक अभियंता, यांत्रिकी विभाग
हेही वाचा :
- महाबळेश्वरात धुवाधार बॅटिंग; महाबळेश्वर-पांचगणी रस्त्यावर पाणी, वाहतूक मंदावली
- बँकिंग कर्ज नियम बदलांची गरज
- नाशिक : हरिहरगड-दुगारवाडीला दुपारी 3 वाजेनंतर ‘नो एन्ट्री’, वनविभागाचा निर्णय
The post नाशिक : घंटागाडी चौकशीचा अहवाल गुलदस्त्यातच, कारवाईची प्रतिक्षा appeared first on पुढारी.