नाशिक : घराला तडे गेलेत, इर्शाळवाडी सारखं होण्याची वाट पाहताय का?

अवैध उत्खनन,www.pudhari.news

कळवण (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

तालुक्यातील मानूर हद्दीतील कोल्हा डोंगराच्या पायथ्याशी गायरान जमिनीतून अवैध मुरूम उत्खनन सुरु असून या उत्खननामुळे माझ्या घराला तडे गेले असून आमच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे.  त्यामुळे प्रशासनाने हे अवैध उत्खनन तात्काळ बंद करावे अशी मागणी शेतकरी प्रदीप बोरसे यांनी तहसीलदार, जिल्हाधिकारी व सरपंच मानूर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. तसेच प्रशासन काय इर्शाळवाडी सारखी दुर्घटना होण्याची वाट पाहतय का?  असा सवाल शेतक-याने पत्रातून उपस्थित केला आहे.

बोरसे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ग्रामपंचायत मानूर ता. कळवणच्या हद्दीतील कोल्हा डोंगराच्या उत्तरेस अनेक शेतकरी शेतात वास्तव्यास आहेत. हा संपूर्ण भाग डोंगर उताराचा आहे. हा डोंगर गायरान जमिनीचा भाग असताना गेल्या महिनाभरापासून एक पोकल्यान मशीन व तीन ते चार ढंपर गाड्या रात्रंदिवस अवैध रित्या मुरूम उत्खनन करीत आहेत. या उत्खननामुळे व उत्खननासाठी वापरल्या जाणाऱ्या अवजड वाहनांमुळे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयापासून दादाजी नामदेव मेधने यांच्या घरापर्यंत रस्त्याची दुरावस्था झाली आहे. ठिकठिकाणी रस्त्याला मोठं मोठे खड्डे पडले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतमालाची वाहने घेऊन जाण्यास मोठी कसरत करावी लागत आहे. तसेच या रस्त्यालगत माझा बेलगोठा व घर आहे. त्यास मोठे मोठे तडे पडले आहेत. भिंती मोडकळीस आल्या आहेत. घरात संसार उपयोगी वस्तू, शेती उपयोगी साहित्य, एक बैलगाडी, दोन म्हशी, दोन नवीन गिर्हे, तीन गायी, एक पारडी यासह शेतमजूर देखील वास्तव्यास आहेत. पावसाळा सुरु असून प्रशासन इर्शाळवाडी सारखी दुर्घटना घडण्याची वाट पाहत आहे का? असा सवाल बोरसे यांनी तहसीलदार, मंडळअधिकारी, तलाठी, सरपंच ग्रामसेवक यांना पत्राद्वारे केला आहे.

महिन्यापासून होत असलेलं अवैध उत्खनन व वाहतूक कळवण-नाशिक या मुख्य रस्त्याने होत असताना महसूल विभागाच्या कोणत्याच कर्मचाऱ्याला दिसत नाही का? ही अवैध मुरूम वाहतूक तात्काळ थांबवा अन्यथा होणाऱ्या नुकसानीस जिल्हाधिकारी, तहसीलदार, ग्रामसेवक, सरपंच हे सर्व जवाबदार असतील असा इशारा बोरसे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : घराला तडे गेलेत, इर्शाळवाडी सारखं होण्याची वाट पाहताय का? appeared first on पुढारी.