नाशिक : घोलप, बागूल यांची राऊत दौर्‍याकडे पाठ, 15 माजी नगरसेवकांनीही मारली दांडी

संजय राऊत,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाचे उमटलेले तीव्र पडसाद शिवसेनेत ठिकठिकाणी पाहावयास मिळत असताना, शिवसेनेचे उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख तथा खासदार संजय राऊत यांच्या नाशिक दौर्‍यातही पडसाद दिसून आले. शिवसेना उपनेते बबन घोलप तसेच सुनील बागूल यांच्यासह जवळपास 15 हून अधिक माजी नगरसेवकांनी या दौर्‍यानिमित्त आयोजित बैठकीकडे पाठ फिरविल्याने हा चर्चेचा विषय ठरला.

ठाणे आणि नवी मुंबईतील शिवसेनेच्या माजी नगरसेवकांनी शिंदे गटाला समर्थन दिले. त्याचे परिणाम इतरही ठिकाणी होतात की काय, यासाठी शिवसेनेकडून नेत्यांच्या दौर्‍यानिमित्त खातरजमा केली जात आहे. त्यासाठी संजय राऊत हे गुरुवारी (दि. 7) रात्री नाशिकमध्ये दाखल झाले. शुक्रवारी (दि. 8) सकाळपासून त्यांनी शहर आणि ग्रामीण भागातील पदाधिकार्‍यांशी संवाद साधला. यावेळी नाशिक जिल्हा संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, आमदार नरेंद्र दराडे, मनपाचे माजी विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, माजी गटनेते विलास शिंदे तसेच माजी आमदार वसंत गिते, राजाभाऊ वाजे, योगेश घोलप तसेच दत्ता गायकवाड, महेश बडवे, सचिन मराठे, जयंत दिंडे, संजय चव्हाण, संतोष गायकवाड आदी पदाधिकारी व माजी नगरसेवक उपस्थित होते. परंतु, उपनेते सुनील बागूल, बबन घोलप यांच्यासह 15 हून अधिक माजी नगरसेवकांची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवली. बागूल यांनी घरगुती कारण सांगत बैठकीला हजेरी लावली नाही, तर इतरांनीही विवाहसोहळ्याचे कारण पुढे केले.

मध्यवर्ती कार्यालयातील उपस्थिती जेमतेम
शालिमार येथील कार्यालयात शिवसेनेचे कोणी नेते वा संपर्कप्रमुख आल्यास शिवसैनिक तसेच पदाधिकार्‍यांची उपस्थिती एरवी लक्षणीय असते. परंतु, शुक्रवारी (दि. 8) राऊत यांच्या दौर्‍याप्रसंगी मात्र तेवढी उपस्थिती दिसून आली नाही. अर्थात, त्यास इतरही कारणांबरोबरच शुक्रवारी दिवसभर नाशिकमध्ये सुरू असलेल्या संततधारेमुळे अनेकांना येता आले नसावे, हेदेखील कारण असू शकते. अनेकांनी तर केवळ काही वेळेपुरती हजेरी लावून काढता पाय घेतला. त्यामुळे आगामी काळात हेच चित्र वेगळ्या स्वरूपात दिसल्यास नवल नसावे.

नाशिकरोडला आज शक्तिप्रदर्शन
खा. राऊत यांनी बंडखोर आमदार दादा भुसे आणि नांदगावचे आमदार सुहास कांदे यांच्या मतदारसंघांतील शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांसोबत चर्चा करीत तेथील स्थितीचा आढावा घेतला. शिंदे गटाच्या बंडात तेथील पदाधिकारी सामील होण्याची शक्यता पाहता, तेथील पदाधिकारी आणि आमदारांना पर्याय देण्याच्या दृष्टीने दोन्ही तालुक्यांची चाचपणी करण्यात आली. दरम्यान, शिवसेनेला पाठिंबा दर्शविण्याच्या अनुषंगाने शनिवारी (दि. 9) नाशिकरोडला इच्छामणी लॉन्समध्ये मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : घोलप, बागूल यांची राऊत दौर्‍याकडे पाठ, 15 माजी नगरसेवकांनीही मारली दांडी appeared first on पुढारी.