नाशिक : चारशेच्या फेऱ्यात अडकला कांदा

कांदा,www.pudhari.news

नाशिक (लासलगाव) : पुढारी वृत्तसेवा

राज्यासह देशांतर्गत पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, राजस्थान तसेच गुजरातमध्ये गेल्या वर्षापेक्षा लाल कांद्याचे बंपर उत्पादन झाल्याने कांदादरात घसरण झाली आहे. आज येथील बाजार समितीत लाल कांद्याला किमान चारशे, सरासरी सातशे, तर कमाल अकराशे रुपयांचा भाव मिळाला. यंदा चारशेच्या फेऱ्यात कांदा अडकला आहे.

गेल्या वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यापेक्षा यंदा तीनलाख क्विंटलने आवक जास्त आहे. दर घसरल्याने शेतकऱ्यांना अंदाजे १५१ कोटी ४५ लाख रुपयांचा फटका बसला आहे. राज्यासह देशांतर्गत पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, राजस्थान तसेच गुजरातमध्ये गेल्या वर्षापेक्षा लाल कांद्याचे उत्पादन बंपर झाल्याने महाराष्ट्रातील कांद्याला देशांतर्गत मागणीत घट झाली आहे. त्याचा थेट परिणाम बाजारभाव घसरणीवर झाला.

आशिया खंडातील कांद्याची अग्रेसर बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या लासलगाव बाजार समितीत गेल्या वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यापेक्षा यंदा तीन लाख क्विंटलने जादा आवक झाली आहे. २०२२ मध्ये फेब्रुवारीत सुमारे नऊ लाख क्विंटल लाल कांद्याची आवक झाली. तर २०२३ च्या फेब्रुवारीत ११ लाख ६५ हजार क्विंटल आवक झाली आहे.

गेल्या वर्षी फेबुवारी महिन्यात ९ लाख क्विंटल लाल कांद्याला कमाल ३११५ रुपये, किमान ५०० रुपये, तर सरासरी २१३३ रुपये प्रतीक्विंटल बाजारभाव मिळाला होता. यंदा फेब्रुवारीतील ११ लाख ६५ हजार क्विंटल कांद्याला कमाल १६०० रुपये, किमान २०० रुपये, तर सरासरी ८४० रुपये प्रती क्विंटल बाजारभाव मिळाला. गेल्या वर्षापेक्षा शेतकऱ्यांना प्रतिक्विंटलमागे १३०० रुपये नुकसान झाल्याने अंदाजे १५१ कोटी ४५ लाख रुपयांचा एकट्या लासलगाव बाजार समितीत विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना बसला आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : चारशेच्या फेऱ्यात अडकला कांदा appeared first on पुढारी.