नाशिक : चार मद्यपी वाहनचालकांचे परवाने निलंबित, आरटीओकडून तपासणी मोहीम

नाशिक खाजगी बस तपासणी,www.pudhari.news

पंचवटी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

प्रादेशिक परिवहन विभागाकडून खासगी प्रवासी बसेस तसेच इतरही वाहनांची तपासणी मोहीम सुरू असून, यात जवळपास १,०९४ वाहनांची तपासणी करण्यात आली. तपासणीत सुमारे ४३७ वाहने दोषी आढळल्याने त्यांच्याकडून १७ लाखांचा दंड वसूल करण्यात आला.

बोरगाव येथील तपासणी नाका येथे चार चालक मद्यप्राशन करून वाहन चालवताना आढळली. त्यांची वाहने ताब्यात घेत त्यांचे परवाने निलंबित करण्यात आल्याचे प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रदीप शिंदे आणि प्रभारी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रशांत देशमुख यांनी सांगितले.

राज्यात दि. १ ते ३१ जुलै २०२३ दरम्यान खासगी प्रवासी बसेस, वाहनांची विशेष तपासणी मोहीम सुरू आहे. ताब्यात घेतलेली १६ वाहने प्रादेशिक परिवहन कार्यालयात आणण्यात आली आहेत. मोहिमेत मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या वाहनचालकांना शोधणे, वेग नियंत्रकामध्ये छेडछाड करणे, अग्निशमन यंत्रणा नसणे, विनापरवाना अथवा परवान्याच्या अटींचा भंग करणारी वाहने, क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी नेणे, अवैध टप्पा वाहतूक, अवैध मालवाहतूक करणाऱ्या बसेस, वाहनामध्ये बेकायदेशीर केलेले फेरबदल आदींबाबत तपासणी करण्यात येत आहे. विशेष तपासणी मोहिमेत मोटर वाहन निरीक्षक मनीषा चौधरी, नितीन उके, नितीन अहिरे, अभास देसाई, सचिन पाटील, सहायक मोटर वाहन निरीक्षक प्रांजली देवरे आदी अधिकारी सहभागी झाले होते.

बोरगाव सीमा तपासणी नाका येथे परराज्यातून येणाऱ्या-जाणाऱ्या सर्व वाहनांची 24 तास ड्रिंक अँड ड्राइव्ह अंतर्गत तपासणी करण्यात येत आहे. मद्यप्राशन करून वाहन चालवताना आढळल्यास वाहन जप्त करण्याबरोबरच परवानादेखील निलंबित करण्यात येईल.

-प्रदीप शिंदे, प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी, नाशिक

..

The post नाशिक : चार मद्यपी वाहनचालकांचे परवाने निलंबित, आरटीओकडून तपासणी मोहीम appeared first on पुढारी.