नाशिक: चाळीतील कांद्यावर अज्ञाताने युरिया टाकल्याने मोठे नुकसान

देवळा; पुढारी वृत्तसेवा: उन्हाळी कांद्याला भाव वाढेल, या आशेने चाळीत साठवणूक करून ठेवलेल्या कांद्यावर वाखारी येथे अज्ञाताने युरिया टाकून कांद्याचे मोठे नुकसान केले आहे.

याबाबत माहिती अशी की ,वाखारी येथील शेतकरी दिनेश श्रीराम चव्हाण यांच्या मालकीच्या गट नंबर 1588 मधील राहत्या घरासमोरील कांदा चाळीत अज्ञात व्यक्तीने युरिया टाकून अंदाजे 200 ते 250 क्विंटल उन्हाळा कांदा खराब केला आहे. बुधवारी (दि. २५) सकाळी दिनेश चव्हाण हे कांदा चाळीकडे गेल्यावर त्यांना चाळीतील कांद्यावर युरिया टाकलेला दिसला. हा प्रकार चव्हाण यांनी घरी व नातेवाईकांना सांगितला.

अज्ञात व्यक्तीने केलेल्या या खोडसाळ प्रकाराने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकाराची पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत संबंधित शेतकऱ्याने अज्ञात व्यक्तीचा शोध घेऊन कारवाई करण्याची मागणी केली आहे. दरम्यान चव्हाण यांच्या दुसऱ्या ठिकाणी रस्त्यालगत असलेल्या चाळीत देखील युरिया टाकण्यात आला आहे. सध्या बाजारात आवक कमी असल्याने कांद्याचे भाव बऱ्यापैकी वाढले आहेत. त्यात अशा प्रकारच्या खोडसाळ वृत्तीने कांदा खराब झाल्याने दिनेश चव्हाण यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे.

दरम्यान, देवळा कृषी उत्पन्न बाजार समितीत आज अंदाजे 5 हजार 500 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती . भाव कमीतकमी 2 हजार 305 जास्तीत जास्त 5 हजार 100 तर सरासरी 4 हजार 355 पर्यंत स्थिर होते.

हेही वाचा 

The post नाशिक: चाळीतील कांद्यावर अज्ञाताने युरिया टाकल्याने मोठे नुकसान appeared first on पुढारी.