नाशिक : चिंच झोडताना 115 पक्ष्यांचा तडफडून मृत्यू; वनविभागाकडून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

सिन्नर www.pudhari.news

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा
येथील हॉटेल पंचवटी मोटेल्सच्या आवारातील आंबट चिंचेच्या झाडावरील वाळलेल्या चिंच झोडण्याचे काम सुरु असताना बुधवारी (दि.31) सकाळी दहा ते बारा वाजेदरम्यान सुमारे 115 पक्षी व पिलांचे प्राण गेले. याप्रकरणी वनविभागाने तिघांविरुध्द वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकाराने पक्षिप्रेमींसह सामान्यांमध्ये हळहळ व्यक्त होत असून संतापही व्यक्त केला जात आहे. दरम्यान वनविभागाने 22 पक्ष्यांचे प्राण वाचविल्याची माहितीन वनपरिक्षेत्र अधिकारी मनीषा जाधव यांनी दिली.

इम्रान शबीर सय्यद (32), शर्वर शकील शेख (38), सादिक शकील शेख (30, सर्व रा. रा. सिन्नर, जि. नाशिक) अशी संशयित आरोपींची नावे आहेत. याबाबत सविस्तर वृत्त असे बसस्थानकाच्या पुढच्या बाजूस असलेल्या हॉटेल पंचवटीच्या आवारात आंबट चिंचेचे झाड असून वाळलेल्या चिंचा झोडण्याचे काम कामगारांना देण्यात आले होते. सकाळी दहाच्या सुमारास हे काम सुरु झाले कामगारांनी लाठ्याकाठ्यांच्या सहाय्याने चिंच झोडण्यास सुरुवात केली. चिंचेचे झाड बरेच जुने असल्याने त्यावर विविध पक्ष्यांची मोठ्या प्रमाणावर घरटी आहेत.कामगारांनी या घरट्यांकडे आणि त्यांतील पिले व अंडी याकडे दुर्लक्ष केले. परिणामी शेकडो पक्ष्यांची पिले मृत झाली. काही पक्षिप्रेमींच्या हा खळबळजनक प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी वनविभागाला या बाबत माहिती दिली. त्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी मनीषा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी तिथे पोहोचले. त्यांनी चिंच झोडण्याचे काम बंद पाडत तिघा कामगारांना ताब्यात घेतले व त्यांच्याविरुध्द वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला.

102 पाणकावळे, 13 ढोकरी गतप्राण :
या घटनेत 115 पक्षी मृत पावले असून त्यात 102 पाणकावळे तर 13 ढोकरी पक्ष्यांचा समावेश असल्याची माहिती वनविभागाने दिली. तथापि, मृत पक्ष्यांचा आकडा दोनशे ते तिनशेच्या घरात असावा. मात्र वनविभागाने तो लपवला असल्याचा आरोप वन्यजीवप्रेमींनी केला आहे.

पिले प्राण सोडत होती, कामगार चिंचा झोडत होते
हॉटेल पंचवटीच्या आवारात आंबट चिंचा झोडण्याचे काम सुरु असताना पानकावळा, ढोकरी पक्ष्यांच्या घरट्यात मोठ्या प्रमाणात नवजात पिले व अंडी होती. ही पिले मार लागल्यानंतर झाडावरुन टपाटप खाली पडत होती. तडफडून प्राण सोडत होते. तरीही कामगार चिंचा झोडतच होते. हा हृदयद्रावक प्रकार काही प्रत्यक्षदर्शींना सहन झाला नाही. त्यांनी वनविभागाला माहिती दिल्यानंतर वनविभागाचे पथक घटनास्थळी पोहचले.

हेही वाचा:

The post नाशिक : चिंच झोडताना 115 पक्ष्यांचा तडफडून मृत्यू; वनविभागाकडून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल appeared first on पुढारी.