नाशिक : चेहेडीत उभारणार निओ मेट्रोचा डेपो

निओ मेट्रो,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
निओ मेट्रो प्रकल्पाच्या कासवगतीने सुरू असलेल्या हालचालींना वेग देण्यासाठी मंगळवारी (दि. 2) महापालिकेत निओ मेट्रोबाबत बैठक झाली असता, मेट्रोच्या डेपोसाठी नाशिकरोड, चेेहेडी येथील 10 एकर जागेची मागणी केल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे. ही जागा सिटीलिंकसाठी आरक्षित असून, काही जागा ट्रक टर्मिनसच्या ताब्यात आहे. त्यामुळे ही जागा निओ मेट्रो प्रकल्पासाठी दिल्यास सिटीलिंक आणि ट्रक टर्मिनससाठी पर्यायी जागा महापालिकेला उपलब्ध करून द्यावी लागणार आहे. तसेच गंगापूर गाव परिसरातील बारदान फाटा या भागातही तितकीच जागा उपलब्ध करून देण्याच्या महापालिका प्रशासनाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

काही दिवसांपूर्वी अर्थसंकल्पीय अधिवेशनात नाशिकच्या निओ मेट्रो प्रकल्पाला गती देणार असल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले होते. त्यानंतर पीएमओ कार्यालयाने या प्रकल्पाबाबतचा आराखडा मागवून घेतला होता. त्यावेळी महापालिका आयुक्तांनी स्वत: दिल्लीवारी केली होती. या प्रकल्पाची घोषणा करताना तो डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण करण्याची डेडलाइनही जाहीर केली होती. त्यासाठी 2100.6 कोटी रुपयांचा खर्च जाहीर करताना केंद्र सरकारने 707 कोटी देऊ केले होते. त्यामध्ये महापालिकेचा 255 कोटींचा वाटा राहणार होता. तर उर्वरित 1,161 कोटी सिडको कर्जातून उभारणार होते. या प्रकल्पासाठी जागा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी महापालिकेवर असून, त्यानुसार नाशिकरोड, चेहेडी येथील 10 एकर जागेची मागणी आहे, तर गंगापूरगाव परिसरातही नगररचना विभागाकडून जागेचा शोध घेतला जात आहे.

पूर्णत्वाबाबत प्रश्नचिन्ह
दरम्यान, या प्रकल्पाचे काम कासवगतीने सुरू असल्याने तो पूर्णत्वास कधी येईल, याबाबत आता नाशिककरांकडून शंका उपस्थित केली जात आहे. डिसेंबर 2023 अखेरपर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे आव्हान होते. प्रत्यक्षात या प्रकल्पाच्या नाशिकरोड ते गंगापूरगाव या दोन डेपोंसाठीच्या जागेचाच शोध सुरू असल्याने, तो पूर्णत्वास कधी येईल याविषयी मोठे प्रश्नचिन्ह आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : चेहेडीत उभारणार निओ मेट्रोचा डेपो appeared first on पुढारी.