नाशिक : चौकातील फेरीवाल्यांना हटविणार, झोपड्यांवरही हातोडा

फेरीवाल्यांना हटविणार,www.pudhari,news

नाशिक : पुढारी महापालिका

गेल्या काही दिवसांपासून महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्यावतीने शहरातील सहाही विभागात धडक कारवाई केली जात असून, आता प्रमुख चौकांचा श्वास मोकळा करण्यासाठी विशेष मोहिम हाती घेतली जाणार आहे. या मोहिमेअंर्गत चौकातील फेरीवाले तसेच फुटपाथवर अनधिकृतपणे झोपड्या उभारून वास्तव्य करणाऱ्यांना हटविले जाणार आहे.

शहरातील प्रमुख चौकांमध्ये फेरीवाले तसेच लहान-मोठ्या विक्रेत्यांनी अतिक्रमणे केल्याने वाहतुकीच्या कोंडीबरोबरच छोट्या-मोठ्या अपघाताच्या घटना नित्याच्याच झाल्या आहेत. या भागातील अतिक्रमणे हटवून चौकांचा श्वास मोकळा केला जावा, अशी सातत्याने मागणी होत असल्याने महापालिकेने उशिरा का होईना कारवाईसाठी तत्परता दाखविली आहे. त्यानुसार सोमवारी (दि.२४) पंचवटी विभागातील काही चौकांमध्ये धडक कारवाई केली. तसेच शहरातील इतरही विभागात अशाप्रकारची कारवाई करून चौकांचा श्वास मोकळा केला जाणार आहे. या कारवाईदरम्यान, चौकातील पथविक्रेते, फेरीवाले, हातगाडीवाल्यांना हटविले जाणार आहे. तसेच बहुतांश चौकांमधील फुटपाथवर झोपड्या उभारल्या असून, अत्यंत धोकादायक पद्धतीने लहानग्यांसोबत गजरा, खेळणी विक्रेते याठिकाणी वास्तव्य करीत आहेत. अशात ‘हिट अॅण्ड रन’ची घटना घडण्याची शक्यता असल्याने, या झोपड्या तातडीने हटविण्यात येणार असल्याचे अतिक्रमण विभागाने स्पष्ट केले आहे.

गोरगरिबांवरच डोळा

महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने आतापर्यंत छोट्या विक्रेत्यांवरच कारवाईचे धाडस दाखविले आहे. त्यामध्ये भाजीपाला विक्रेते, हातगाडीवाले, फेरीवाले यांच्यावरच कारवाई केल्याने, बड्या विक्रेत्यांवर कारवाई कधी असा सवाल उपस्थित केला जात आहे.

शहराच्या सहाही विभागातील चौकांमधील अतिक्रमणे हटविली जाणार आहे. सोमवारपासून (दि.२४) या कारवाईला सुरुवात केली आहे. काही बड्या अतिक्रमण धारकांबाबतच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर त्यांच्यावर कारवाई केली जाईल.

– नितीन नेर, प्रभारी अतिरिक्त उपायुक्त, अतिक्रमण विभाग

हेही वाचा :

The post नाशिक : चौकातील फेरीवाल्यांना हटविणार, झोपड्यांवरही हातोडा appeared first on पुढारी.