नाशिक : चौथ्या माळेदिवशी सप्तशृंगीगड भाविकांनी फुलला

सप्तशृंगीगड

सप्तशृंगीगड: पुढारी वृत्तसेवा : हिंदू धर्मात नवरात्रीला खूप महत्त्व आहे. नवरात्रीमध्ये देवीचे नऊ रूपांची पूजा केली जाते. चौथ्या दिवशी कुष्मांडा देवीची पूजा केली जाते. आई कुष्मांडा देवीने विश्वाची निर्मिती केली असे मानले जाते. कुष्मांडा हा संस्कृत शब्द आहे. ज्याचा अर्थ कुम्हादाचा त्याग करणे असा होतो. कुष्मांडाची पूजा केल्याने सर्व प्रकारच्या संकटांपासून मुक्ती मिळते, असे मानले जाते. यासोबतच सुख-समृद्धीही लाभते.

साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धे आद्य स्वयंभू शक्तीपीठ श्री क्षेत्र सप्तशृंगगड येथे नवरात्रोत्सवाच्या चौथ्या दिवशी हजारो भाविकांनी भक्तिमय वातावरणात देवीचे दर्शन घेतले. यावेळी श्री सप्तशृंगी देवीची महापूजा सहा.जिल्हाधिकरी तथा उपविभागीय अधिकारी विशाल नरवडे यांनी सहपरिवार केली. ग्रापंचायत सदस्य कल्पना मनोज बर्डे यांनी महापूजा केली. सकाळी सप्तशृंगी देवीला सुवर्णालंकारांनी सजविण्यात आले. गडावरील पुरोहितांच्या मंत्रघोषात सकाळी ७ वाजता देवीची महापूजा करण्यात आली.

यावेळी देवीचे रूप अधिकच खुलून दिसत होते. यावेळी संपूर्ण गडावर भाविक ‘सप्तशृंगी माता की जय, बोल अंबे माते की जय’चा मोठ्या आवाजात जयघोष करत होते. श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टच्या प्रसादालयात सुमारे १० हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. भाविकांना सुरक्षित दर्शन घेण्यासाठी ट्रस्टच्या मार्फत व्यवस्था करण्यात आली आहे. याकामी ट्रस्टचे कर्मचारी, ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी मेहनत घेत आहे.

सप्तशृंगी गडावर दिवसेंदिवस भक्तांची गर्दी वाढत आहे. परंतु, त्या प्रमाणात सुविधा उपलब्ध करून दिल्या जात नाहीत. पाणीटंचाईला भक्तांना समोरे जावे लागत आहे. त्यामुळे भाविकांतून नाराजी व्यक्त होत आहे. नियोजन शून्य कारभारामुळे सप्तशृंगी गडावरील ग्रामस्थांना आणि भाविकांना अनेक अडचणीला सामोरे जावे लागत आहे.

हेही वाचा 

The post नाशिक : चौथ्या माळेदिवशी सप्तशृंगीगड भाविकांनी फुलला appeared first on पुढारी.