
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक महानपालिकेमार्फत मागील तीन वर्षांत रस्त्यांच्या कामांकरता एकूण ४८९.७२ कोटी रुपये खर्च करण्यात आला असून, दैनंदिन कामांचे गुणवत्ता नियंत्रणाच्या दृष्टीने त्रयस्त संस्था नेमणुकीची प्रक्रिया महापालिकेमार्फत सुरू आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आ. छगन भुजबळ यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नावर लेखी उत्तरातून दिली.
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री भुजबळ यांनी नाशिक शहरातील रस्त्याच्या कामांची गुणवत्ता दर्जाहिन असल्याबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. यामध्ये नाशिक महापालिकेने गेल्या अडीच वर्षांत रस्त्यांच्या कामासाठी सुमारे साडेसहाशे कोटी रुपये खर्च करूनदेखील पावसाळ्यात या रस्त्यांवर खड्डे पडल्यामुळे विविध संघटनांकडून माहे सप्टेंबर २०२२ मध्ये वा त्यादरम्यान आंदोलने करण्यात आली आहेत.
नाशिक शहरातील रस्त्याच्या कामांची गुणवत्ता दर्जाहिन असल्याबाबत नाशिक महापालिकेला असंख्य तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. या रस्त्याच्या कामांची गुणवत्ता राखण्याची जबाबदारी बांधकाम विभागासह गुणवत्ता नियंत्रण विभागाची असल्यामुळे शासनाने या तक्रारींची चौकशी केली आहे काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लेखी उत्तरात म्हटले की, नाशिक महापालिका क्षेत्रातील रस्त्यांवर पावसाळ्यात खड्डे पडल्यामुळे विविध संघटनांकडून महापालिकेस निवेदने प्राप्त झाली असून, याबाबत आंदोलने करण्यात आली ही बाब खरी आहे. नाशिक महापालिकेमार्फत मागील तीन वर्षांत रस्त्यांच्या कामांकरता एकूण ४८९.७२ कोटी रुपये खर्च करण्यात आलेला आला आहे. नाशिक शहरामध्ये सद्यस्थितीत भुयारी गटारींची कामे, पाणीपुरवठ्याची कामे, भूमिगत गॅस पाइपलाइन, रिलायन्स, एअरटेल, जिओ फायबर आदी कंपन्यांचे केबल नेटवर्किंगची कामे यामुळे अनेक रस्त्यांवर खोदकामे सुरू असल्यामुळे त्याचप्रमाणे महापालिका हद्दीत स्मार्ट सिटीअंतर्गतसुद्धा अनेक विकासकामे सुरू असल्याने नागरिकांच्या तक्रारी व निवेदने महापालिकेस प्राप्त झालेली आहेत. नाशिक महापालिकेमार्फत रस्त्यांची कामे करताना सदर कामे गुणवत्तापूर्वक होण्याच्या दृष्टीने पुरेपूर दक्षता घेण्यात येते. तसेच, नगरविकास विभागाच्या निर्णयानुसार कामांचे त्रयस्त संस्थेमार्फत तांत्रिक लेखापरीक्षण करण्यासाठी महापालिकेमार्फत शासकीय तंत्रनिकेतन नाशिक या संस्थेची नेमणूक करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे महापालिका क्षेत्रातील दैनंदिन कामांचे गुणवत्ता नियंत्रणाच्या दृष्टीने त्रयस्त संस्था नेमणुकीची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी लेखी उत्तरात म्हटले आहे.
हेही वाचा :
- सोलापूर : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या उपप्रादेशिक अधिका-याला लाच स्वीकारताना अटक
- COVID-19 : चीनमधील कोरोना संसर्ग वाढीवर WHO चिंतीत, कोविड डेटा देण्याची मागणी
- COVID-19 : चीनमधील कोरोना संसर्ग वाढीवर WHO चिंतीत, कोविड डेटा देण्याची मागणी
The post नाशिक : छगन भुजबळांच्या 'त्या' प्रश्नावर मुख्यमंत्र्यांचे लेखी उत्तर appeared first on पुढारी.