नाशिक : जरीफ चिश्ती यांच्या पत्नीला पोलिसांचे संरक्षण

जरीफ बाबा,www.pudhari.news

सिन्नर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा
ख्वाजा सय्यद जरीफ अहमद चिश्ती ऊर्फ जरीफबाबा यांच्या खुनाच्या घटनेनंतर ते राहत असलेल्या सिन्नर तालुक्यातील वावी येथील बंगल्याला पोलिसांनी भेट दिली. तसेच जरीफबाबा यांच्या पत्नीला संरक्षण दिले आहे.

सुफी धर्मगुरू चिश्ती वावीजवळील पिंपरवाडी शिवारात एकांतातील बंगल्यात वर्षभरापासून वास्तव्यास होते. चार महिन्यांपासून त्यांच्यासोबत एक अफगाण महिलाही राहत होती. ती त्यांची पत्नी असल्याचे सांगितले जाते. घटना घडल्यानंतर रात्रीपासूनच जिल्ह्यातील वरिष्ठ पोलिस अधिकारी वावी येथील बाबा राहत असलेल्या बंगल्याच्या परिसरात दाखल झाले. दोन पुरुष व एक महिला पोलिस कर्मचार्‍याचा सशस्त्र बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिस अधिकार्‍यांकडून या महिलेकडे विचारपूस करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, तिला हिंदी अथवा इंग्लिश भाषा येत नसल्याने संभाषणात अडथळे येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

जरीफ चिश्ती बाबा यांची पत्नी तिरीना ही अर्जेंटिनाची मूळ रहिवासी असून, तीदेखील भारतात आश्रित असल्याचे सांगितले जाते. या दोघांकडेही संयुक्त राष्ट्र संघाचे रेफ्यूजी म्हणून ओळखपत्र होते. दरम्यान, जरीफबाबा राहत असलेला सदरचा बंगला मूळचे कोपरगाव तालुक्यातील रहिवासी असलेले व मुंबई येथील वकील आभाळे यांच्या मालकीचा असून, त्यांनी तो जरीफ चिश्ती यांना एक वर्षापासून भाडेतत्त्वावर दिला होता.

वावी पोलिसांची वर्षभरापूर्वी आयबीला माहिती
वावी पोलिसांना वर्षभरापूर्वी या दोघांसह त्याचा चालक गफारबद्दल माहिती मिळाल्यानंतर त्यांनी इंटेलिजन्स ब्युरोला 22 एप्रिल 2021 रोजी यासंदर्भात माहिती दिली होती. इंटेलिजन्स ब्युरोने खातरजमा केल्यानंतर चिश्ती हे निर्वासितांसाठी असलेल्या व्हिसावर भारतात वास्तव्य करत असल्याचे निदर्शनास आल्याने त्यांच्यावर कुठलीही कारवाई करण्यात आली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

दफनविधीचा तिढा
जरीफबाबांच्या अंत्यविधीचा प्रश्न पोलिसांसमोर उभा ठाकला आहे. अंत्यविधीसाठी अफगाणी दूतावासाशी संपर्क साधण्यात आला आहे. तोपर्यंत मृतदेह पोलिसांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात सुरक्षितरीत्या जतन करून ठेवला आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : जरीफ चिश्ती यांच्या पत्नीला पोलिसांचे संरक्षण appeared first on पुढारी.