नाशिक : जलसंधारणाच्या कामांसाठी जिल्हा परिषदेचा अभ्यास दौरा

जलसंधारण www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
डॉ. राजेंद्रसिंह यांनी राजस्थान राज्यात केलेल्या जलसंधारण कामांची यशोगाथा जाणून घेण्यासाठी लघु पाटबंधारे विभागांंतर्गत 26 अधिकारी व कर्मचारी यांनी अलवर राजस्थान येथे झालेल्या जलसंधारण कामांची पाहणी करण्यासाठी चारदिवसीय अभ्यासदौरा आयोजित करण्यात आला आहे.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ अर्जुन गुंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी, लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र नंदनवार यांच्यासह 26 अधिकारी व कर्मचारी यांचे पथक राजस्थान येथे अभ्यास दौर्‍यासाठी गेले आहेत. या अभ्यास दौर्‍यामध्ये जलतज्ज्ञ डॉ राजेंद्र सिंह यांनी राजस्थान अलवर येथे केलेल्या कामांची पाहणी अधिकारी व कर्मचारी करणार आहेत. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत नाशिक जिल्हा परिषदेमार्फत मिशन भगीरथ प्रयास योजना एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत डॉ. राजेंद्र सिंह यांनी मार्गदर्शन केले होते. जिल्ह्यात सर्वत्र महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून मिशन भगीरथ प्रयास अंतर्गत जलसंधारणाची कामे केली जाणार आहेत. ही कामे शास्त्रोक्त पद्धतीने होण्यासाठी या अभ्यास दौर्‍याचा उपयोग होणार आहे. मिशन भगीरथ प्रयास अंतर्गत सुरू असलेल्या जलसंधारण कामांमध्ये सरपंच, ग्रामस्थ, ग्रामसेवक यांना या अभ्यास गटातील जलसंधारण अधिकार्‍यांकडून मार्गदर्शन करण्यात येणार असून सद्यस्थितीत पेठ व सुरगाणा येथे मिशन भगीरथ अंतर्गत मोठ्या प्रमाणावर कामांना सुरुवात झाली आहे. उपक्रमांतर्गत चांगले काम करणार्‍या ग्रामपंचायतींना जिल्हा नियोजन समिती निधीतून अतिरिक्त 10 लाखांचा निधी देण्याची घोषणादेखील पालकमंत्री दादा भुसे यांनी केली आहे. त्यामुळे मिशन भगीरथ प्रयास अंतर्गत जलसंधारणाच्या कामे करताना जास्तीत जास्त संख्येने सहभाग नोंदवावा, असे आवाहन जि.प. च्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी केले आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : जलसंधारणाच्या कामांसाठी जिल्हा परिषदेचा अभ्यास दौरा appeared first on पुढारी.