
नाशिक (जातेगाव) : पुढारी वृत्तसेवा
नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथे गावालगत असणाऱ्या शेतात पुरातन दुर्गादेवीचे मंदिर आहे. ह्या देवस्थानाबाबत शेतजमीनीच्या पहिल्या मालकाचे वंशज प्रमोद गोंधळे यांनी दिलेल्या माहितीनुसार साधारण दिडशे वर्षापूर्वी त्यांचे आजोबा दादाजी गोंधळे हे शेताची मशागत करत असताना त्यांना एका अखंड दगडावर दोन फुट उंचीची दुर्गादेवीची मूर्ती सापडली. त्यांनी याबाबत गावातील चावडीवर येत ग्रामस्थांना माहिती दिली. गावकऱ्यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार परिवारातील सदस्यांच्या मदतीने देवीचे छोटेखानी मंदिराचे बांधकाम करुन मुर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. सन १९५० च्या दशकात संत तुकडोजी महाराज आणि त्यानंतर संत गाडगेबाबा हे जातेगाव येथे आले त्यावेळी त्यांच्या सत्संगाचा मोठा कार्यक्रम येथील मंदिराच्या प्रांगणात झाल्याचे ज्येष्ठ नागरिकांचे म्हणणे आहे.
कालांतराने दादाजी यांच्या मुलगा शिवलींग गोंधळे यांनी येथील शेतजमीन कै. काशिनाथ काका पाटील यांना विकली. त्यानंतर मंदिर जिर्ण अवस्थेत झाल्याने साधारणत: १५ वर्षांपूर्वी देवीची मूर्ती ज्या ठिकाणी सापडली होती. त्याच ठिकाणी नवीन मंदिराचे व सभामंडपाचे बांधकाम करुन समोर २१ फुट उंच दिपमाळ बांधण्यात आली आहे. गोंधळे कुटुंबिय उदरनिर्वाहासाठी नाशिक-मालेगाव-मुलुंड इत्यादी ठिकाणी स्थलांतरीत झाल्यानंतर त्यांचे भाऊबंद सदाशिव गोंधळे यांच्या परिवारातील सदस्य नाना गोंधळे हे या मंदिरात भक्तिभावाने पुजा आराधना करतात, त्यांनी दिलेल्या माहितीनुसार गावातील महिला दरवर्षी मंदिरात श्रध्देने घटींची स्थापना करत आहेत. गावात हे एकमेव देवी मंदिर असल्याने पंचक्रोशीतील भाविक नियमितपणे चैत्र पोर्णिमेला श्रावण महिन्यात तसेच नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने मोठ्या संख्येने दर्शनासाठी हजेरी लावतात. नवरात्रोत्सवानिमित्त देवीमंदिरावर मोठ्या प्रमाणात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आल्याने संध्याकाळी मंदिर उजळून निघाल्याचे मनोहारी दृश्य पाहायला मिळत आहे.
हेही वाचा:
- त्यांच्याकडे ईडी असेल तर आपल्याकडे सीडी : रामराजेंचा खा. रणजितसिंह, आ. जयकुमार गोरेंना टोला
- घटस्फोटाची मागणी केल्याने पतीने पत्नीला संपवले
- ‘पीएफआय’वर पुन्हा कारवाई : ‘एनआयए’चे आठ राज्यांमध्ये छापे, १७० हून अधिक अटकेत
The post नाशिक : जातेगावच्या दुर्गादेवीचे संत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबांनीही घेतले होते दर्शन appeared first on पुढारी.