
नाशिक (दिंडोरी) : पुढारी वृत्तसेवा
तालुक्यातील जालखेड येथील बचतगटाच्या महिलांनी गुरुवारी (दि. 18) दारूविक्रेत्याला रंगेहाथ पकडून चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले.
जालखेड (ता. दिंडोरी) येथे मोठ्या प्रमाणात राजरोस अवैध दारूविक्री होत असून दारूविक्रीमुळे गावातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. शाळेत जाणारी लहान-लहान मुले व अनेक तरुण मंडळी व्यसनाच्या आहारी गेलेली आहेत. याबाबत अनेक वेळा ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन तक्रारी नोंदविल्या तसेच दिंडोरी पोलिस निरीक्षक यांना वेळोवेळी निवेदनेही दिली आहेत. परंतु अद्याप अवैध धंदे बंद झालेले नाहीत. तसेच दारूमुळे गावात मोठ्या प्रमाणावर चोर्या होत आहेत. त्यामुळे गावातील बचतगटाच्या संतप्त महिलांनी गुरुवारी (दि. 18) सकाळी 11 ला समक्ष दारू पकडून दारूविक्रेत्याला चोप दिला. त्यानंतर दिंडोरी पोलिसांना दूरध्वनी करून दारूविक्रेत्याला व साठवून ठेवलेला दारूच्या बाटल्या पोलिसांच्या ताब्यात दिल्या आहेत. दिंडोरी पोलिसांनी योग्य ती दखल घेऊन तालुक्यातील अवैध धंदेवाल्यांवर कडक कारवाई करत अवैध धंदे बंद करावे, अशी मागणी निवेदनाद्वारे दिंडोरी पोलिसांकडे केली आहे. यावेळी मंगला मडके, अंजना झनकर, शांताबाई झनकर, रेखा इंगळे, गंगुबाई शेखरे, योगिता चौधरी, सुरेखा झनकर, राजश्री भुरकूड, कमल झनकर, अश्विनी इंगळे, रोहिणी चौधरी, ताईबाई झनकर, संगीता गायकवाड, सविता चौधरी, वैशाली चौधरी, इंदूबाई इंगळे, अनिता रोकडे, रेश्मा इंगळे, गायश्री शेवरे आदींच्या सह्या आहेत.
अनेक वेळा दारूविक्रेत्याला जालखेड येथील महिलांनी व पोलिसांनी दारूविक्री बंद करण्याचे सांगितले. तरीही सर्रास दारूविक्री करीत होता. त्यामुळे महिलांनी दारूसह रंगेहाथ पकडून पोलिस बाळकृष्ण पजई यांना बोलावून त्यांच्या ताब्यात दिले. दारूविक्रेत्यावर कठोर कारवाई करावी. – योगिता चौधरी, जालखेड.
हेही वाचा:
- Aryan Khan drugs case : ‘एनसीबीने आर्यन-अरबाज मर्चंट यांची नावे आरोपी म्हणून अखेरच्या क्षणी घुसवली’
- Sangli Crime | गुन्ह्याची नवी पद्धत! ‘मुडदा’ पाडून जाळायचा नाही तर पुरायचा! सांगली जिल्ह्यात ५ घटना
- पुणे : पीएमआरडीएकडून दरवर्षी हवे 188 कोटी
The post नाशिक : जालखेडच्या रणरागिणींनी बंद पाडली अवैध दारूविक्री appeared first on पुढारी.