नाशिक : जिल्हाधिकारी कार्यालयाला चिरेबंदी प्रवेशद्वाराचे कोंदण, 13 ला होणार खुले

जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक प्रवेशद्वार,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
हेरिटेज वास्तू असलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयाला चिरेबंदी प्रवेशद्वाराचे कोंदण लाभले आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त शनिवारी (दि.13) हे प्रवेशद्वार सर्वसामान्यांसाठी खुले करण्यात येणार आहे. या प्रवेशद्वाराची उभारणी मनपाच्या स्मार्ट सिटी कंपनीने केली आहे.

बि—टिशांनी 1869 मध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीची उभारणी केली आहे. दीडशे वर्षे पूर्ण झालेल्या या वास्तूसाठी संपूर्णपणे चिरेबंदी दगडात नव्याने प्रवेशद्वार उभारण्यात आले आहे. मनपाच्या स्मार्ट सिटी कंपनीने अशोेकस्तंभ ते त्र्यंबक नाका अशा 1.200 किलोमीटरचा स्मार्ट रोड उभारला. तब्बल अडीच वर्षे चाललेल्या या कामकाजावेळी तत्कालीन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासाठी प्रवेशद्वार उभारण्याची मागणी माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे केली होती. ही मागणी विचारात घेत स्मार्ट सिटी कंपनीने 1 कोटीचा निधी मंजूर केला होता. त्यानंतर गेल्या दीड वर्षापासून या प्रवेशद्वाराच्या बांधणीचे काम स्मार्ट सिटी कंपनीकडून सुरू होते.

प्रवेशद्वाराचे काम पूर्णत्वास आले आहे. निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, उपजिल्हाधिकारी गणेश मिसाळ व तहसीलदार राजेंद्र नजन यांनी शुक्रवारी (दि. 5) कामाची पाहणी करीत कौतुक केले. तसेच किरकोळ कामे व स्वच्छता तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी ठेकेदाराला केल्या.

संस्कृती, परंपरा जपणार
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नव्या चिरेबंदी प्रवेशद्वारावर भारतीय संस्कृती आणि परंपरा जपली जाणार आहे. या ठिकाणी लामणदिवा लावण्यात येणार आहे. हे प्रवेशद्वार 68 फूट लांब असून, त्याची उंची 32 फूट आहे. प्रवेशद्वार उभारणीसाठी 70 लाख रुपये खर्च झाला आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : जिल्हाधिकारी कार्यालयाला चिरेबंदी प्रवेशद्वाराचे कोंदण, 13 ला होणार खुले appeared first on पुढारी.