
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
गाैण खनिज प्रकरणाची कामे व प्रकरणांबाबतचे सर्वाधिकार जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी स्वत:कडे घेतले आहेत. तसे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढल्यामुळे अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे यांच्या अधिकारात कपात झाल्याने त्यांच्या कामकाजावरच अप्रत्यक्षरीत्या ठपकाच ठेवला गेल्याचे मानले जात आहे.
गाैण खनिजसंदर्भात जिल्ह्यातील कनिष्ठ अधिकाऱ्यांकडून दाखल अवैध गौण खनिज उत्खनन, वाहतूक, साठवणूक याबाबत कनिष्ठ अधिकाऱ्यांनी केलेल्या आदेशाविरुध्द अपर जिल्हाधिकाऱ्यांकडे अपील दाखल होऊन त्यावर सुनावणी होते. मात्र, या संदर्भातील कामकाज आता जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत:च्या अखत्यारित घेतले आहे. त्यानुसार याबाबतचे कार्यालयीन कामकाज गाैण खनिज विभागामार्फत करण्यात येईल. तर उपजिल्हाधिकारी (प्रशासन) विभागाच्या संचिका जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करतील. तसेच दाखल हाेणाऱ्या अपिलांचे, पुनरीक्षणाचे कामकाज जिल्हाधिकारी स्वत: बघणार असून, आदेशातच तसे नमूद करण्यात आले आहे. त्यासोबत गौण खनिजविषयक कनिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाविरुद्ध दाखल अपिलांची प्रकरणे तातडीने गाैण खनिज विभागाकडे वर्ग करण्याच्या सूचनाही अपील शाखेला देण्यात आल्या आहेत.
कामकाजावर संशयाचे धुके
गौण खनिजसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेला निर्णय हा महसूल विभागात चर्चेचा विषय बनला आहे. हे आदेश म्हणजे अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजावरच संशयाचे धुके दाटल्यासारखे आहे. तसेच गाैण खनिज विभागाच्या कारभारावरही संशयाची सुई निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे या सर्व प्रकाराबद्दल महसूलमधील अन्य अधिकाऱ्यांनी मात्र चुप्पी साधली आहे.
हेही वाचा :
- चीनसह अमेरिकेकडूनही पाकिस्तान उकळतोय पैसे
- सातारा : शिरवळमधील पुलांखाली पाणीच पाणी
- पुणे : अन्य विभागाच्या अधिकार्यांकडून अधिकार नसतानाही अनाथ प्रमाणपत्रांचे वितरण
The post नाशिक : जिल्हाधिकार्यांनी स्वत:कडे घेतले गौण खनिजचे अधिकार, अपर जिल्हाधिकारी नडे यांच्या अधिकारात कपात appeared first on पुढारी.