नाशिक : जिल्हावासीयांना दमदार पावसाची प्रतिक्षा

पावसाची प्रतीक्षा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

अर्धाअधिक जुलै सरला तरी जिल्ह्याला अद्यापही दमदार पावसाची प्रतिक्षा कायम आहे. पावसाअभावी धरणांनी तळ गाठायला सुरवात केली असून पेरण्याही खोळंबल्या आहेत. जिल्ह्यात यंदाच्यावर्षी आता पर्यंत सरासरी २१४ मिमी पर्जन्याची नोंद झाली आहे. वार्षिक सरासरीच्या तुलनेत हे प्रमाण अवघे २३ टक्के आहे.

उत्तर भारतात पावसाने धुमाकुळ घातला असून दिल्ली, हिमाचल प्रदेश, पंजाबसह अनेक राज्य पुराच्या विळख्यात सापडली आहे. त्यामुळे तेथील जनजीवन पुर्णपणे विस्कळीत झाले आहे. एकीकडे पावसाची दमदार स्थिती असताना महाराष्ट्र त्यातही विशेष करुन उत्तर महाराष्ट्रावर पाउस रुसला आहे. विभागात एकट्या नाशिक जिल्ह्याचा विचार केल्यास १ जुनपासून आतापर्यंत पंधराही जिल्ह्यात सरासरी २१४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्याचे वार्षिक पर्जन्यमान एकुण सरासरी ९३४ मिमी असून त्याची तुलना केल्यास २५ टक्यांहून कमी पर्जन्याची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात अन्य तालुक्यांच्या तुलनेत दिंडोरीत चांगला पाऊस झाला आहे. तालुक्यात आजपर्यंत २७० मिमी पाऊस पडला असून वार्षिक सरासरीच्या ४० टक्के इतके हे प्रमाण आहे. त्याखालोखाल कळवणला वार्षिक सरासरीच्या तुलनेत ३४ टक्के पाऊस झाला आहे. दुसरीकडे पावसाचे माहेरघर म्हणून ख्याती असलेल्या इगतपूरी व त्र्यंबकेश्वर तालूक्यावर जणू तो काही रूसला आहे. या दोन्ही तालूक्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत अनुक्रमे २० व २२ मिमी पाऊस पडला आहे. नाशिक तालूक्यात २०.१ मिमी पर्जन्याची नोंद झाली आहे. जिल्ह्यात अन्यत्रही चित्र वेगळे नसून जवळपास बहुतांक्ष तालूक्यांमध्ये वीस ते ३० टक्यां मध्ये पावसाची नोंद झाली आहे. पावसाचा लहरीपणा कायम राहिल्यास येत्याकाळात परिस्थिती अधिक भयावह होणार आहे. त्यामुळेच जिल्हावासीयांनी आता देवाचा धावा करायला सुरवात केली आहे.

धरणांना मेघांची ओढ

जिल्ह्यातील प्रमुख २४ धरणांमध्ये सद्यस्थितीत २० हजार २२३ दलघफू पाणीसाठा उपलब्ध आहे. त्याची टक्केवारी ३१ इतकी आहे. गेल्यावर्षीशी तुलना केल्यास या कालावधीत धरणे ७३ टक्के भरलेली हाेती. म्हणजेच ४७ हजार ९५४ दलघफू इतका पाणीसाठा त्यावेळी उपलब्ध होता. गतवर्षीशी तुलना केल्यास यंदा धरणांनाही मेघांच्या ओढ लागून राहिलेली आहे.

वार्षिक सरासरीच्या तुलनेत पर्जन्य (टक्के)

मालेगाव ३०, बागलाण २६.२, कळवण ३३.४, नांदगाव १९.६, सुरगाणा २९.७, नाशिक २०.१, दिंडोरी ३९.८, इगतपूरी १९.८, पेठ २५.१, निफाड २६.८, सिन्नर १८.८, येवला २९.५, चांदवड १९.४, त्र्यंबकेश्वर २१.८, देवळा २८.५

राज्यात २८.४ टक्के पर्जन्य

यंदाच्या वर्षी महाराष्ट्रावर पावसाने वक्रदृष्टी केली आहे. राज्याचे १ जुन ते ३० सप्टेंबर याकाळातील सरासरी पर्जन्यमान १००४.२ मिमी असताना आतापर्यत २८५ मिमी पर्जन्याची नोंद झाली आहे. हे प्रमाण २८.४ टक्के आहे. दरम्यान, उत्तर महाराष्ट्राची वार्षिक सरासरी ७०७ मिमी असून केवळ २५ टक्के पाऊस यंदा पडला आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : जिल्हावासीयांना दमदार पावसाची प्रतिक्षा appeared first on पुढारी.