पिंपळगाव बसवंत (नाशिक) : पावसाचा लांबलेला मुक्काम व गेल्या काही वर्षांत जलयुक्त शिवारसह जलसंधारणाची झालेली कामे यामुळे नाशिक जिल्ह्यात यंदा जलक्रांती झाल्याचे स्पष्ट होत आहे. त्या माध्यमातून जिल्हा पाणीदार झाला असून, यंदा भूजल पातळी सरासरी एक मीटरने वाढली आहे. तालुकानिहाय विचार करता नेहमी दुष्काळाचे चटके सोसणाऱ्या चांदवड तालुक्याची पाणीपातळी सर्वाधिक २.६२ मीटरने वाढल्याची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यांत पाणी पातळीने उसळी घेतल्याने दुष्काळाच्या झळा यंदा बसणार नसल्याचे चित्र आहे.
तीन वर्षांपूर्वी सततच्या कोरड्या दुष्काळाच्या गडद छायेत जिल्ह्यातील बहुतांश भागात टँकरने तहान भागवून पाण्याची खरी किंमत जवळून अनुभवली आहे. पर्जन्यमान कमी असण्याबरोबरच पाणी अडविणे, जिरविण्याचे अत्यल्प प्रकल्प व उपशाचे प्रमाण वाढल्याने जिल्ह्याची भूजल पातळी गंभीर वळणावर पोचली होती. अशा परिस्थितीत शासनाने जलसंधारणाच्या कामाला गती देण्यासोबतच जलयुक्त शिवारची कामे जलदगतीने हाती घेतली. त्यातच दोन वर्षांपासून वरुण राजा मुक्तहस्ते बरसला.
हेही वाचा >> बारा दिवस झुंजूनही अखेर सलोनीला मृत्यूने गाठलेच; मामाच्या गावी भाचीचा दुर्देवी अंत
या तालुक्यात पावसाचा आखडता हात
नाशिकच्या भूजल विभागाकडून सप्टेंबरनंतर जिल्ह्यातील १८५ निरीक्षण विहिरींची पाणीपातळी तपासण्यात आली. त्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाकडे सादर केला आहे. त्यानुसार सप्टेंबरअखेरीस पातळी वाढली आहे. परंतु गेल्या पाच वर्षांच्या सरासरीनुसार दिंडोरी, इगतपुरी, पेठ, त्र्यंबकेश्वर तालुक्यांत सरासरी अर्धा मीटरने पातळी खाली असल्याचे दिसून आले आहे. दर वर्षी सर्वधिक पाऊस होणाऱ्या व धरणाचे तालुके म्हणून ओळख असलेल्या ठिकाणी पावसाने आखडता हात घेतला आहे. याचा परिणाम तालुक्यातील पाणीटंचाईवर फारसा होणार नसल्याचे भूजल विभागाने सांगितले. जिल्ह्यात पहिला टँकर येवला, नांदगाव तालुक्याला लागतो. सद्यःस्थितीनुसार मे महिन्याच्या मध्यापर्यंत पाणीसाठा पुरू शकतो. डोंगराळ भाग, वाड्या या दर वर्षीप्रमाणे टँकरचा पर्याय अवलंबावा लागणार आहे.
हेही वाचा >> खळबळजनक! तीन दिवसांपासून बेपत्ता तरुणाची थेट मिळाली डेड बॉडीच; कुटुंबाला घातपाताचा संशय
तालुकानिहाय पाणीपातळी वाढ-घट (मीटरमध्ये)
* बागलाण - २.४० वाढ
* चांदवड - २.६२ वाढ
* देवळा - २.१३ वाढ
* दिंडोरी - ०.५३ घट
* इगतपुरी - ०.४९ घट
* कळवण - ०.४७ वाढ
* मालेगाव - १.३९ वाढ
* नांदगाव - १.९८ वाढ
* नाशिक - ०.५७ वाढ
* निफाड - ०.८८ वाढ
* पेठ - ०.७० घट
* सिन्नर - १.५२ वाढ
* सुरगाणा - ०.३६ वाढ
सरासरीपेक्षा अधिक पाऊस व जलसंधारणाची कामे झाल्याने अवर्षणप्रवण भागात यंदा पाणीपातळी वाढली आहे. तालुक्यातील सर्व भागाची सरासरी काढण्यासाठी संबंधित भागात निरीक्षण विहिरी निवडल्या जातात. निरीक्षण विहिरींच्या पाणी पातळीवरून परिसराची पाणीटंचाई किंवा योजना आणण्यासाठी आधार घेतला जातो.
-जीवन बेडवाल, वरिष्ठ भुवैज्ञानिक