नाशिक : जिल्हा परिषदेत ‘गुंडा’राज; आ. सुहास कांदे यांचा बैठकीत आरोप

नाशिक जिल्हा नियोजन समिती बैठक, www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नांदगाव मतदारसंघात येणाऱ्या मालेगाव तालुक्यातील ४८ गावांना निधी द्यायचा नाही का, असा मुद्दा उपस्थित करत आ. सुहास कांदे यांनी थेट अधिकाऱ्यांवरच शरसंधान केले. निधी वितरणात जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे हे दडपशाही, ब्लॅकमेलिंग करत असून, जिल्हा परिषदेत गुंडाराज सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला. गुंडे यांच्यावर कारवाईची मागणी केल्याने गुंडे भोवळ येऊन पडले. अखेर पालकमंत्र्यांनी बैठक गुंडाळली.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन हॉलमध्ये जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आ. कांदे यांनी आक्रमक धोरण घेतले. नांदगाव मतदारसंघातील ४८ गावे मालेगाव तालुक्यात आहेत. पण या गावांच्या विकासासाठी जिल्हा परिषद निधीच उपलब्ध करून देत नसल्याचा आरोप करीत आ. कांदे संतापले. अतिरिक्त मुख्य कार्यकारी गुंडे यांना नियतव्यय शब्दाचा अर्थ विचारताना जिल्हा परिषद हेच चालवतात. कोणत्याही विभागाचे काम असले, तरी ठेकेदार हे गुंडे यांच्याच दालनात घुटमळत असतात. गुंडे यांची दडपशाही व ब्लॅकमेलिंग सुरू असून, त्यांनी गडगंज संपत्ती जमवली आहे. ईडीकडून चाैकशी केल्यास सत्य बाहेर येईल, असे आ. कांदे म्हणाले. तसेच गुंडे यांच्यावर कारवाईचा प्रस्ताव सर्व आमदारांनी मांडून तो संमत करावा, अशी मागणीही त्यांनी केली. त्यावर उत्तर देण्यासाठी उभे राहिलेल्या गुंडे यांना भोवळ आल्याने ते खाली पडले. अन्य अधिकाऱ्यांनी त्यांना सावरले. या घटनेनंतर ना. भुसे यांनी बैठक अटोपती घेतली.

तुमची लायकी आहे का?

जिल्हा परिषदेतील खैरनार नावाच्या शिपायामार्फत तुम्हाला निधी मिळणार नाही, परत कॉल करू नका, अशी धमकी दिली जाते. मला धमकी देण्याची यांची लायकी नाही, असे सांगत आ. कांदे यांनी गुंडे यांना धारेवर धरले. तसेच गुंडे यांचे कॉल रेकॉर्ड तपासावे, सर्व सत्य बाहेर येईल, असेही आ. कांदे म्हणाले. दरम्यान, भाेवळ आल्यानंतर गुंडे यांना उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. त्यांचा रक्तदाब आणि ईसीजी तपासण्यात आला. रक्ताचे नमूनेही घेण्यात असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याने त्यांना घरी सोडण्यात आले.

निधीबाबत चौकशी करू : ना. भुसे

पालकमंत्री भुसे यांनी बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना मालेगाव तालुक्यातील गावांना निधी वितरणात आपण कुणावर अन्याय केला नसल्याचे सांगितले. तसेच आ. कांदे यांच्या आरोपांची दखल घेत मालेगावात कोणत्या गावाला किती निधी वितरीत झाला याची माहिती प्रशासनाने सादर करावी असे आदेश त्यांनी दिले. त्यामध्ये कोणत्या गावावर अन्याय झाल्यास चौकशी करू असे आश्वासन ना. भुसे यांनी दिले.

संदर्भसेवाचा निधी पळविली

संदर्भ सेवा रूग्णालयातील देखभाल-दुरूस्तीसाठी दोन कोटी रूपयांचा निधी मंजूर आहे. हा निधी मंजूर होण्यासाठी गेल्या आठ वर्षांपासून पाठपुरावा केल्याचे आ. फरांदे यांनी बैठकीत सांगितले. परंतु, संदर्भ सेवा रूग्णालयाने हा निधी थेट औषध खरेदीसाठी पळविल्याचा आरोप फरांदे यांनी केला. त्यावर भुसे यांनी संबंधित रूग्णालयाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला असता त्यांनीही हा औषध खरेदीस निधी वापरल्याची पुष्टी दिली.

सिटीस्कॅन द्यावे

जिल्हा रूग्णालयात सिटीस्कॅन मशिन बंद असून एमआरआयची सुविधा नसल्याची बाब आ. फरांदे यांनी बैठकीत निदर्शनास आणून दिली. जिल्हा नियोजन समितीतून त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन भुसे यांनी दिले.

सभागृहाला टाळे : हिरे

शहरात आमदार निधीतून उभारलेल्या सामाजिक सभागृहांमध्ये आरोग्य केंद्र उभारणीच्या नावाखाली मनपाचे अधिकारी टाळे लावत असल्याचा आरोप आ. हिरे यांनी केला. अधिकारी दडपशाही करत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आरोग्य केंद्राला आमची हरकत नसून केवळ कोठे ते उभारणार याची माहिती दिल्यास सहकार्य करू, असेही हिरे म्हणाल्या.

कामे रद्दवरून रणकंदन

जिल्हा परिषदेतील ३५ कोटींची कामे रद्द करण्याबाबत आ. कोकाटे व खोसकर यांनी जाब विचारत कामे रद्द करण्याची कारणे सांगा, असा मु्द्दा बैठकीत उपस्थित केला. त्यावर जिल्हा परिषदेचे अधिकारी निरूत्तर झाले. अखेर भुसे यांनी पुढे येत निधी परत जायला नको म्हणून दीडपटएैवजी दोन पट कामे आराखड्यात धरली. वाढलेल्या अर्धा टक्यातील हीच ३५ कोटींची कामे असून ती चालूवर्षी करण्यात येतील, असे स्पष्ट केले.

हेही वाचा : 

The post नाशिक : जिल्हा परिषदेत 'गुंडा'राज; आ. सुहास कांदे यांचा बैठकीत आरोप appeared first on पुढारी.