नाशिक जिल्हा परिषदेत ‘लेटलतिफांना’ प्रशासनाकडून नोटीस

नाशिक : जिल्हा परिषदेत बुधवारी (ता. २०) लेटलतिफांबाबत झाडाझडती घेण्यात आल्यानंतरही गुरुवारी (ता. २१) पाच कर्मचारी कार्यालयीन वेळेत उपस्थित न झाल्याने त्यांना सामान्य प्रशासन विभागाकडून नोटीस बजावण्यात आल्या. दरम्यान, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंद पिंगळे यांनी नाशिक पंचायत समितीमध्ये गुरुवारी सरप्राईज व्हिजिट दिली. यामध्ये ३८ कर्मचारी कार्यालयीन वेळेत उपस्थित नसल्याचे आढळून आल्याने सदरच्या कर्मचाऱ्यांना नोटिसा देण्याची सूचना गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. 

लेटलतिफांना प्रशासनाकडून नोटीस 

जिल्हा परिषद, तसेच पंचायत समिती कार्यालयांमध्ये कर्मचारी कार्यालयीन वेळेत येत नसल्याचे निदर्शनास आल्याने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्या निर्देशानुसार जिल्हा परिषद प्रशासनाने पंचायत समिती व जिल्हा परिषदेमध्ये कर्मचाऱ्यांच्या हजेरीपत्रकांची तपासणी सुरू केली आहे. बुधवारी कार्यालयीन वेळेनंतर येणाऱ्या १४३ कर्मचाऱ्यांची मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी कानउघाडणी करत उशिराने आल्यास प्रथम माझी भेट घेत नंतर काम करण्याची ताकीद दिली होती. कारवाई करण्याचे निर्देश सर्व विभागांना दिले होते. प्राथमिक शिक्षण विभागातील चार, तर बांधकाम दोन विभागातील एक कर्मचारी कार्यालयीन वेळेत उपस्थित नसल्याने त्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.  

हेही वाचा > ''माझ्या बायकोला आधी वाचवा हो'', रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या नवऱ्याचा आक्रोश; दुर्देवी घटना

हेही वाचा > ‘कोब्रा-घोणस’च्या लढाईचा थरार! मांजराने केली मध्यस्थी; पाहा VIDEO