नाशिक : जिल्हा परिषद भरती प्रक्रिया युद्धपातळीवर

जिल्हा परिषद नाशिक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

जिल्हा परिषदेची प्रलंबित भरती प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात असून, येत्या आठ दिवसांत भरतीची राज्यस्तरावर जाहिरात निघण्याची शक्यता आहे. परीक्षेसाठी आयबीपीएस कंपनीची नियुक्ती केली असून, कंपनीने डेमोद्वारे अधिकारी-कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे.

दोन महिन्यांपूर्वी या भरतीसाठी संवर्गनिहाय अभ्यासक्रम जाहीर करण्यात आला होता. दरम्यान, देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात ७५ हजार पदे भरण्याबाबत शिंदे-फडणवीस सरकारने मोठ्या प्रमाणात तयारी केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून जानेवारीमध्ये जिल्हा परिषदेच्या रिक्त जागांपैकी ८० टक्के जागा भरण्यासाठी वेळापत्रक जाहीर केले होते. मात्र, नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता आल्याने ही भरती प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली होती. त्यानंतरही ही प्रक्रिया संथ गतीने सुरू होती. आता ही भरती प्रक्रिया राबविण्यासाठी कंपनी निश्चित तसेच अभ्यासक्रम निश्चित केला आहे. त्यामुळे येत्या आठवडाभरात ही जाहिरात येण्याची दाट शक्यता आहे.

२,०३० जागांचा समावेश

ग्रामविकास विभागाकडून राज्यातील जिल्हा परिषदांमधील गट ‘क’ संवर्गातील रिक्त जागांपैकी ८० टक्के जागा भरल्या जाणार आहेत. नाशिक जिल्हा परिषदेत सद्यस्थितीत गट ‘क’ संवर्गातील २,५३८ रिक्त जागांच्या ८० टक्के म्हणजे २,०३० जागांचा समावेश आहे, तरीही कोणत्या संवर्गाच्या किती पदांच्या भरतीला मान्यता मिळाली आहे, हे अधिकृत परिपत्रक आल्यावर समोर येईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

The post नाशिक : जिल्हा परिषद भरती प्रक्रिया युद्धपातळीवर appeared first on पुढारी.