Site icon

नाशिक : जिल्हा मध्यवर्ती बँक वसुलीविरोधात शेतकरी आक्रमक

नाशिक (वणी) : पुढारी वृत्तसेवा
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने थकबाकी वसुली सुरू करत थेट शेतकर्‍यांच्या बांधावर जमीन जप्तीचे फलक लावल्याने बँकेच्या या कारवाईविरोधात शेतकरी आक्रमक झाले आहेत. यातून काही ठिकाणी अधिकारी व शेतकरी यांच्यात वाददेखील होत आहे. जिल्हा बँकेच्या कर्मचार्‍यांनी वणी परिसरात शेतकर्‍यांच्या बांधावर फलक लावून जप्तीच्या सूचना दिल्या आहेत. याबाबत न्यायालयात लढाई सुरू असल्याचे सांगत शेतकरी बँकेच्या या कृत्याचा विरोध करत आहेत. तसेच याबाबत शेतकर्‍यांकडून शासनालाही पत्रव्यवहार करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, जिल्हाभरात बँकेकडून होत असलेल्या या कारवाईच्या विरोधात शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी, प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप, प्रशांत कड, गंगाधर निखाडे, संतोष रेहरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्याची तयारी शेतकर्‍यांची चालविली आहे.

उत्पन्नापेक्षा खर्च जास्त…
शेतीत उत्पन्नापेक्षा खर्चच अधिक होत असल्याने शेतकरी कर्जबाजारी होत चालला आहे. फळबागासह भाजीपाल्याला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत आहे. त्यातच आता बँकाकडून वसुलीसाठी तगादा लावला जात असल्याने शेतकर्‍यांची अवस्था इकडे आड तिकडे विहीर अशी झाली आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : जिल्हा मध्यवर्ती बँक वसुलीविरोधात शेतकरी आक्रमक appeared first on पुढारी.

Exit mobile version