नाशिक : जिल्हा रुग्णालयात पाणी थेंब थेंब गळं…

जिल्हा रुग्णालय नाशिक,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या मुख्य इमारतीला गळती लागली असून, अनेक कक्षांमधील छताचे पीओपी अचानक गळून पडत असल्याने रुग्णांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यातच दुसरीकडे स्वच्छतागृहात अनेक दिवसांपासून पाणी नसल्याची ओरड रुग्णांसह नातलगांनी केली आहे. छतामध्ये पाणी झिरपत असल्याने इमारतीच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

जिल्हा शासकीय रुग्णालयात दररोज शेकडो रुग्णांवर उपचार केले जातात. बाह्यरुग्ण विभाग व आंतररुग्ण विभागात उपचार घेत असतात. रुग्णालयाची मुख्य इमारत सुमारे ४० वर्षे जुनी आहे. त्यामुळे इमारतीची डागडुजी नियमित करणे आवश्यक आहे. मात्र, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे डागडुजीकडे दुर्लक्ष झाल्याचे समोर आले आहे. गुरुवारी (दि.६) दुपारनंतर रुग्णालयातील जळीत कक्षातील छताचे पीओपी अचानक खाली कोसळले. सुदैवाने खाटेवर रुग्ण नसल्याने दुर्घटना टळली. कक्षाच्या छताला ओल आली असून अनेक ठिकाणांहून पाणी गळत आहे. ओलाव्यामुळे छताचे पीओपी खाली पडत असल्याचे आढळून आले. दरम्यान, याच कक्षातील स्वच्छतागृहात दहा दिवसांपासून पाणी नसल्याची तक्रार रुग्ण व नातलगांनी केली. त्यामुळे त्यांना पाण्यासाठी कसरत करावी लागत आहे. तर दुसरीकडे छतातून पाणीगळती होत असल्याने त्यांना खाटा सरकवून उपचार घ्यावे लागत असल्याचे चित्र आहे.

इतर कक्षांमध्येही दुरवस्था

रुग्णालयातील इतर कक्षांमध्येही अशीच परिस्थिती असल्याचे आढळून आले आहे. त्याचप्रमाणे रुग्णालयाच्या आवारातील अस्वच्छता, ड्रेनेज लाइन, रंगरंगोटी, फरशी, पीओपी, पाइपलाइनची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. त्यामुळे रुग्णालयात वावरताना सर्वांना अडचणींचा सामना करत काळजीही घ्यावी लागत आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणी दौऱ्यात रुग्णालयीन इमारतीच्या दुरवस्थेबाबत चर्चा झाली आहे. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत इमारतीच्या दुरुस्तीसाठी निधीची तरतूद केली जाईल. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत इमारतीची डागडुजी होणार आहे.

डॉ. अशोक थाेरात, जिल्हा शल्यचिकित्सक

हेही वाचा :

The post नाशिक : जिल्हा रुग्णालयात पाणी थेंब थेंब गळं... appeared first on पुढारी.