नाशिक : जिल्हा रुग्णालयातील मृतदेहांची हेळसांड थांबणार

शव विच्छेदन गृह,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा 

नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात मृतदेहांची होणारी हेळसांड आता थांबणार असून जिल्हा रुग्णालयाला शव विच्छेदन गृहासाठी 80 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.  नाशिक जिल्हा रुग्णालयाला 24 नोव्हेंबर रोजी पालकमंत्री दादा भुसे यांनी अचानक भेट देत पाहणी केली होती. यावेळी प्रशासनाचा अनागोंदी कारभार पालकमंत्र्यांच्या लक्षात आल्याने संबंधित यंत्रणेची कानउघडणी केली होती. तसेच कोल्डरूमच्या शीतयंत्रणेसाठी शासनाकडे पाठवलेल्या प्रस्तावाचे तातडीने पाठपुरावा करण्याचे आदेश पालकमंत्री भुसे यांनी दिले होते. त्यानुसार तीन महिन्यातच शवागारातील शीत शवपेट्यांसाठी 80 लाखांचा निधी मंजूर करत आश्वासन पूर्ती केली आहे.

शवागारातील शीतयंत्रणा कोरोनाच्या आधीपासून तब्बल अडीच वर्षापासून बंद पडल्याचे पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आले होते. तसेच शवागारातील शीत शवपेट्या जर्जर अवस्थेत असल्याने त्याचा फारसा फायदा होताना दिसत नव्हता. त्यामुळे जिल्हा रुग्णालायाकडून एकूण 50 शीत शवपेट्यांची मागणी केली होती. मात्र हा प्रस्ताव गेल्या तीन वर्ष लालफितीत अडकलेला होता. तसेच पालकमंत्र्यांच्या पाहणी दरम्यान लक्षात आले की, गेल्या दोन महिन्यांपासून मृतदेह कुजत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरलेली होती.

यावेळी किमान 60 मृतदेहांची व्यवस्था होईल अशी यंत्रणा उभारण्याच्या प्रस्तावाचा पाठ पुरावा करण्याचे निर्देशही पालकमंत्र्यांनी दिले होते. या विषयांकडे गांभीर्याने बघत डीपीडीसीच्या बैठकीत या विषयाला प्राधान्य देण्यात आले व जिल्हा रुग्णालयाला तब्बल 80 शव पेटी मंजूर करण्यात आल्या आहेत. पालकमंत्र्यांच्या पुढाकाराने मृतदेहाची होणारी हेळसांड थांबणार असून यामुळे जिल्हा रुग्णालयाला मोठा दिलासा मिळाला आहे. या भेटी दरम्यान पालकमंत्री दादा भुसे यांनी 60 मृतदेह ठेवता येतील अशी यंत्रणा उभारण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार पालकमंत्र्यांनी नाशिककरांना दिलेला शब्द पाळत दोन महिन्यात सर्व मंजुऱ्या घेत आश्वासन पूर्ती केली आहे.

डीपीडीसीच्या बैठकीत या विषयाला प्राधान्याने घेतल्याने आरोग्य यंत्रणेला मोठा दिलासा मिळाला असून तब्बल 80 मृतदेहांची व्यवस्था होईल अशी व्यवस्था नव्याने करण्यात आली असून यासाठी 80 लाखांचा निधी देखील मंजूर करण्यात आला आहे. गेल्या तीन वर्षापासून धुळखात पडत असलेला प्रस्ताव पालकमंत्री दादा भुसे यांनी तीन महिन्यात मार्गी लावल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

हेही वाचा : 

The post नाशिक : जिल्हा रुग्णालयातील मृतदेहांची हेळसांड थांबणार appeared first on पुढारी.