Site icon

नाशिक : जिल्हा रुग्णालयास क्रिटिकल केअर हॉस्पिटलची मान्यता

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

रुग्णांना सर्वसमावेशक व अत्याधुनिक आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी याकरिता पंतप्रधान आयुष्मान भारत हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर मिशन अंतर्गत नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात १०० बेडचे सुसज्ज क्रिटिकल केअर रुग्णालय तसेच इंटिग्रेटेड हेल्थ पब्लिक लॅबरोटरी क्रिटिकल केअर हॉस्पिटलला राज्य स्तरावरून प्रशासकीय मान्यता मिळाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिली. त्याचप्रमाणे आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी नाशिक विभागात २५३ कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी दिल्याचीही माहिती ना. डॉ. पवार यांनी दिली.

ना. डॉ. पवार यांनी सांगितले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या सहकार्याने राज्य स्तरावरून जिल्हा रुग्णालयाच्या १०० बेडसच्या रुग्णालयास प्रशासकीय मान्यता मिळाली. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील तालुक्यांमधील उपजिल्हा, ग्रामीण रुग्णालयांमधील विविध कामांनाही मंजुरी मिळाली. त्यानुसार १०० टक्के केंद्र पुरस्कृत १५ व्या वित्त आयोगातून जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालय कळवण, मालेगाव, सिन्नर, येवला, चांदवड व ग्रामीण रुग्णालय इगतपुरी, वणी, सटाणा, नामपूर, डांगसौंदाणे, दोडी, सुरगाणा, दिंडोरी, वणी, त्र्यंबकेश्वर, हरसूल, नांदगाव, निफाड, पेठ ग्रामीण रुग्णालयात नवीन पेडियाट्रिक आयसीयू वॉर्ड तयार करणे, ब्लॉक पब्लिक हेल्थ युनिटच्या कामास परवानगी मिळाली आहे. त्याचप्रमाणे वीरगाव, चिंचोली, निळवंडी व मातेरेवाडी, सामुंडी व देवडोंगर, नांदगाव, येवला तालुक्यातील जळगाव (निं), मालेगाव तालुक्यातील चिंचवे येथे नवीन उपकेंद्र बांधण्यास तर अभोणा, नगरसूल, निफाड, पेठ, गिरणारे, इगतपुरी ग्रामीण रुग्णालयांमध्ये सुधारित प्रसूती कक्ष व वॉर्ड विस्तार करण्यास मंजुरी मिळाली. त्याचप्रमाणे इतर प्रसूतिगृहांच्या नूतनीकरण, कर्मचारी निवासस्थानाच्या कामास मंजुरी मिळाली आहे. नाशिक येथील २०० बेडेड रुग्णालयात नवीन आयसीयू वाॅर्ड तयार करणे, जिल्हा सामान्य रुग्णालयातील मुख्य इमारतीमध्ये बालकांकरिता पेडियाट्रिक आयसीयू वाॅर्ड, कळवण उपजिल्हा, मालेगाव शासकीय रुग्णालयात नवीन आयसीयू वाॅर्ड तयार करण्यास मंजुरी मिळाली आहे. तसेच उपजिल्हा रुग्णालय कळवण येथे १५० बेड, पेठ येथे ७० बेड, सुरगाणा येथे ७० बेड, चांदवड, नांदगाव, वणी व हरसूल येथे प्रत्येकी २० बेडसच्या फील्ड रुग्णालयास मंजुरी मिळाली असून, त्याचे कामदेखील सुरू झाल्याचे ना. डॉ. पवार यांनी सांगितले.

चार जिल्ह्यांसाठी तरतूद

नाशिक विभागातील अहमदनगर, नंदुरबार, धुळे, जळगाव जिल्ह्यातील आरोग्य सुविधांसाठीही निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्यात हेल्थ युनिट बांधणे, नवीन पेडियाट्रिक आयसीयू वॉर्ड व आयसीयू वॉर्ड नूतनीकरन करणे आदी कामांना मंजुरी मिळाली आहे.

हेही वाचा : 

The post नाशिक : जिल्हा रुग्णालयास क्रिटिकल केअर हॉस्पिटलची मान्यता appeared first on पुढारी.

Exit mobile version