नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्हा शासकीय रुग्णालयात वीजपुरवठा खंडित झाल्याने व जनरेटरही नादुरुस्त झाल्याने शनिवारी (दि.२०) सायंकाळी सुमारे तासभर अंधार होता. वीजपुरवठा नसल्याने अतिदक्षता विभाग, आपत्कालीन विभाग, ब्लड बँक व इतर महत्त्वाच्या विभागांचे कामकाज खोळंबले होते. तसेच रुग्णसेवेवर मर्यादा आल्या होत्या. मात्र तासाभरानंतर वीजपुरवठा आल्याने सर्व सुरळीत झाले.
शनिवारी सायंकाळी साडेचार ते साडेपाचच्या सुमारास रुग्णालयातील वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यातच जनरेटरही नादुरुस्त असल्याने वीजपुरवठा झाला नाही. यामुळे रुग्णालयात सर्वत्र अंधार पसरला होता. उपचारासाठी लागणाऱ्या यंत्रणाही बंद होत्या किंवा बॅकअप असेपर्यंत सुरू होत्या. वीजपुरवठा नसल्याने गंभीर रुग्णांवरील उपचारासाठी कसरत करावी लागली. मात्र डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांनी हे संकट टाळले. दरम्यान, एसएनसीयू कक्षात असलेल्या इनक्युबेटरला तासभराचा बॅकअप असल्याने तेथे उपचार घेणाऱ्या बाळांना कोणताही धोका नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मात्र, विजेअभावी ब्लड बँकेतील रक्तसाठा खराब होण्याचा धोका निर्माण झाला होता. जनरेटर दुरुस्तीसाठी वारंवार पाठपुरावा करूनही ती समस्या सोडवली जात नसल्याने ही समस्या उद्भवल्याचे बोलले जात होते.
वीजपुरवठा सुरळीत झाला असून उपचारात खंड पडलेला नाही. जनरेटरमध्ये बिघाड असल्याने ही समस्या झाली. लवकरच यावर तोडगा काढला जाईल. – डॉ. अरुण पवार, प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय.
हेही वाचा:
- मुझे जाने दो, बच्चों को सुबह स्कूल जाना है!: मीरा राजपूत
- Aryan Khan Drugs Case : आर्यन खान ड्रग्ज प्रकरणासंबंधी समीर वानखेडे यांची सीबीआयकडून आज पुन्हा चौकशी
- महाराष्ट्रात आता उरलीत फक्त ३५० एकपडदा चित्रपटगृहे !
The post नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालय अंधारात appeared first on पुढारी.