नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात संततधार कायम

Rain update:

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यामधील पेठ, सुरगाणा, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर व दिंडोरी तालुक्यांमध्ये सलग पाचव्या दिवशी संततधार कायम आहे. त्या तुलनेत अन्य तालुक्यांमधील जोर काहीसा ओसरला आहे. नाशिक शहरात दिवसभर पावसाने विश्रांती घेतली. दरम्यान, धरणांमधील आवक कायम असून, तब्बल 12 धरणांतून विसर्ग केला जात आहे. गंगापूरमधून 10035 क्यूसेक विसर्ग कायम असल्याने गोदावरीचा पूर कायम आहे. पुढील दोन दिवस जिल्ह्याचा रेड अलर्ट कायम आहे.

पाच दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने मुक्काम ठोकला असून, मंगळवारी (दि.12) त्याने हजेरी लावली. जिल्ह्याच्या पश्चिम पट्टयाला पावसाने अक्षरश: झोडपून काढले आहे. पेठ तालुक्यात सकाळी 8.30पर्यंत संपलेल्या 24 तासांमध्ये सर्वाधिक 328.2 मिमी पर्जन्याची नोंद झाली आहे. तर सुरगाण्यात 270 मिमी पाऊस झाला असून, दिंडोरीत 172, कळवणला 139.5 व र्त्यंबकेश्वरला 131.5 मिमी पर्जन्याची नोेंद झाली. पश्चिम भागात पावसाचा जोर कायम असताना नाशिक शहरात सकाळी 10 च्या सुमारास हलक्या ते मध्यम सरी बरसल्या. त्यानंतर मात्र उघडीप दिली असून, सायंकाळी 5.30पर्यंत 5.1 मिमी पर्जन्याची नोंद झाली. उर्वरित तालुक्यांमध्ये पावसाच्या अधूनमधून मध्यम ते जोरदार सरी बरसल्या. सलगच्या पावसामुळे धरणांच्या पाणीपातळीत वाढ होेत आहे. परिणामी धरणांमधील विसर्ग कायम आहे. गंगापूरमधील विसर्गामुळे गोदावरीची पूरपरस्थिती कायम आहे. त्यामुळे गोदाकाठावरील जनजीवन विस्कळीत झाले आहे. दारणामधून 14342, कडवामधून 3517, पुनदनमधून 8710, चणकापूरमधून 16192, पालखेडमधून 29420, पुणेगावमधून 3918, करंजवणद्वारे 20852 तर वाघाडमधून 804 क्यूसेक विसर्ग नदीपात्रात केला जात आहे. नांदूरमध्यमेश्वरमधून 78 हजार 276 क्यूसेक वेगाने पाणी जायकवाडीकडे झेपावत आहे. यंदाच्या हंगामातील नांदूरमध्यमेश्वरचा हा सर्वाधिक विसर्ग ठरला आहे.

हेही वाचा :

The post नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात संततधार कायम appeared first on पुढारी.