Site icon

नाशिक : जिल्ह्यातील कर्मचारी, शिक्षक आजपासून संपावर; शासकीय कार्यालयांचे कामकाज थंडावणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी जिल्ह्यातील 25 हजारांहून अधिक शासकीय कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मंगळवार (दि.14)पासून बेमुदत संपावर जाणार आहेत. त्यामुळे शासकीय कार्यालयांमधील कामकाज थंडावणार आहे.

जुनी पेन्शन लागू करावी या प्रमुख मागणीसाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना आक्रमक झाली आहे. संघटनेने बेमुदत संपाची हाक दिली असून, त्याला सर्व शासकीय कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांचा पाठिंबा मिळतो आहे. दरम्यान, संपावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी (दि.13) संघटनांच्या पदाधिकार्‍यांशी मुंबईत चर्चा केली. मात्र, ती निष्फळ ठरल्याने नियोजित संप अटळ आहे. जिल्ह्यातील महसूल, जिल्हा परिषदेसह सर्व शासकीय विभागांमधील कर्मचारी तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी असे 25 हजारांहून अधिक जण संपात सहभागी होणार आहेत. संघटनेने यापूर्वी घेतलेल्या निर्णयानुसार सोमवारी (दि.13) सायंकाळी 6 ला कार्यालयाची सुटी झाल्यानंतर कर्मचार्‍यांनी विभागाच्या चाव्या वरिष्ठांकडे सुपूर्द केल्या. तत्पूर्वी संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी द्वारसभा घेत संपाबाबतची पुढील रणनीती ठरवली. एकूणच कर्मचार्‍यांची तयारी बघता शासकीय कार्यालयांचे कामकाज मंगळवार (दि.14)पासून थंडावणार आहे.

* शासकीय कार्यालयांमध्ये आजपासून शुकशुकाट
* सर्वसामान्यांची कामे रखडणार
* महापालिका कर्मचारी काळ्या फिती लावून कामकाज करणार
* मागणी मान्य होईपर्यंत माघार न घेण्याची कर्मचार्‍यांची भूमिका

पंधरा दिवसांपासून तयारी
जुन्या पेन्शनसंदर्भात शासकीय कर्मचार्‍यांच्या संघटनेने यापूर्वी विविध मार्गाने आंदोलन करत शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो निष्फळ ठरल्याने आता बेमुदत संपाचे हत्यार उपसण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर गेल्या 15 दिवसांपासून तालुका स्तरावर संघटना पदाधिकार्‍यांनी बैठक घेत संप यशस्वी करण्यासाठी जनजागृती केली.

मार्चअखेरच्या कामांना फटका
जुन्या पेन्शनसंदर्भात शासकीय कर्मचारी संघटनांनी पुकारलेल्या संपात लेखा व कोषागारे विभागाचे कर्मचारी सहभागी होणार आहेत. महाराष्ट्र राज्य लेखा व कोषागारे कर्मचारी संघटनेने (गट क) याबाबत पत्र यासंदर्भात जिल्हा स्तरावरील पदाधिकार्‍यांना काढले आहे. या पत्रात सहसंचालक व कोषागार / उपकोषागार कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी आपले सेवार्थ प्रणाली, ट्रेझरी नेट प्रणाली व इतर लॉगिन आयडी व पासवर्ड बंद लिफाफ्यात कार्यालय / शाखाप्रमुख यांच्याकडे जमा करावे. संपकाळात कोणत्याही परिस्थितीत आपला लॉगिन करू नये, ओटीपी देऊ नये अशी सूचना करण्यात आली आहे. सर्व उपकोषागार अधिकारी व कर्मचार्‍यांनी संपात सहभागी होताना कार्यालयाच्या चाव्या व सुरक्षाकक्षेच्या चाव्या पाकिटात बंद करून तहसीलदार यांना पत्रासह सुपूर्द करत पोहोच घ्यावी, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे मार्चअखेरच्या कामांना फटका बसणार आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : जिल्ह्यातील कर्मचारी, शिक्षक आजपासून संपावर; शासकीय कार्यालयांचे कामकाज थंडावणार appeared first on पुढारी.

Exit mobile version