नाशिक : पुढारी वृत्तसेवा
पावसाच्या दडीने अवघ्या जिल्ह्यावर टंचाईचे सावट दाटले आहे. त्यामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. टंचाई काळात करावयाच्या उपाययोजनांबाबत पालकमंत्री दादा भुसे यांनी सोमवारी (दि. २८) आढावा बैठक बोलाविली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात होणाऱ्या या बैठकीत काय निर्णय होतो, याकडे सामान्यांचे लक्ष लागले आहे.
चालू वर्षी अल निनोच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात दमदार पाऊस झालेला नाही. त्यामुळे राज्याला भीषण पाणीटंचाईला तोंड द्यावे लागेल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या आठवड्यात राज्याचा आढावा घेतला. यावेळी जिल्हा प्रशासनाने पाण्याचे काटेकोरपणे नियोजन करताना त्याचा काटकसरीने वापर करावा, असे निर्देश दिले. तसेच पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देत त्यानंतर शेती व उद्योगांचा विचार करावा, अशा सूचनाही शासनाने दिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर भुसे यांनी सोमवारी (दि. २८) टंचाई आढावा बैठक बोलाविली आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत ४४ टक्के पाऊस झाला आहे. धरणांमध्येही ६६ टक्केच पाणीसाठा आहे. अशा परिस्थितीत पावसाने ओढ दिल्याने जिल्ह्यातील ६७ गावे व ४० वाड्या अशा एकूण १०७ ठिकाणी ५८ टँकरच्या साहाय्याने पाणीपुरवठा केला जात आहे. सध्याचे चित्र बघता येत्या काळात टँकरच्या मागणीत वाढ होऊ शकते. एकूणच जिल्ह्यातील संभाव्य टंचाईची भीषणता लक्षात घेता, पालकमंत्र्यांच्या अध्यक्षेखाली होणाऱ्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा :
- अहमदनगर लष्करी विभागाच्या हद्दीतील 634 बांधकामे अनधिकृत
- ऑन दि स्पॉट होणार दूध का दूध अन्..! अहमदनगर जिल्हा पथक अलर्ट
- Nashik Murder : बाचाबाचीतून मित्राचा भोसकून खून, अपघाताचा बनाव करून संशयितांनीच केले रुग्णालयात दाखल
The post नाशिक : जिल्ह्यातील टंचाईवर आज चर्चा, पालकमंत्र्यांनी बोलाविली बैठक appeared first on पुढारी.